
बोर्लीपंचतन नदीचा श्वास कोंडला
श्रीवर्धन, ता. १० (बातमीदार) : तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या बोर्लीपंचतन गावाच्या प्रवेशाजवळ असलेल्या हात नदी आणि परिसरात अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिकांकडून कचरा टाकला जात आहे. या परिसराला कचराभूमीचे स्वरूप आले आहे. स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या ग्रामपंचायतीचे मात्र या कचऱ्याकडे दुर्लक्ष होत असून पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेने बोर्लीपंचतन ग्रामपंचायतीकडे पत्राद्वारे लक्ष वेधले होते. मात्र, ग्रामपंचायतीने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मनसेने केला आहे.
ग्रामपंचायतीमार्फत घंटागाडी गावात आहे; मात्र कधी कधी गाडी निघून गेल्यास ग्रामस्थ आणि व्यावसायिक कचऱ्याचे वर्गीकरण न करता प्लास्टिकासह सुका व ओला कचरा थेट नदीत टाकत आहेत. अनेक वर्षांपासून हा प्रकार राजरोस सुरू आहे. या कचराभूमीमुळे नदीला मोठा धोका पोहोचत आहे. यात नदीचे विद्रूपीकरण होत आहे. याशिवाय, कचऱ्यामुळे दुर्गंधी येत असून नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. अनेक पर्यावरणप्रेमी तसेच नागरिकांनी हा मुद्दा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये अनेक वेळा मांडले. त्यानंतरही सत्ताधारी ग्रामपंचायत या विषयाकडे कानाडोळा करत आहेत. पावसाळ्यादरम्यान तर नदीचे पाणी वाढले की, कचरा प्रवाहासह वाहून सर्वत्र पसरतो. त्यामुळे नदीचे पाणीच नव्हे, तर लागूनच असलेल्या काठावरील दोन्ही बाजूच्या शेतीवर परिणाम होत आहे.
एकीकडे ग्रामपंचायत प्रशासन गाव स्वच्छतेचा नारा देत आहे. तर दुसरीकडे कचरा थेट नदीपात्रात उघड्यावर टाकण्याच्या प्रकाराकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अनेक ग्रामसभांमध्ये सुरुवातीलाच कचराभूमीचा प्रश्न प्रकर्षाने उपस्थित होत असतो. तरी त्यावर प्रत्यक्षात कोणतीही अंमलबजावणी होत नसल्यामुळे हा प्रश्न दरवर्षी प्रलंबितच राहत आहे.
शहर कचराकुंडीविना
गावात कचरा टाकण्यासाठी कुठेही कचराकुंड्या नाहीत. त्यामुळे नागरिक घरातील कचरा या ठिकाणी टाकतात. गावाचे प्रवेशद्वार असल्याने पुलालगत दिवे आणि परिसरात सीसी टीव्ही बसवण्यात यावे. जेणेकरून काळोखाचा फायदा घेऊन कोणीही कचरा टाकणार नाही. कचरा टाकणारी व्यक्ती सीसी टीव्हीत दिसल्यास दंड आकारता येईल. यामुळे कचरा टाकणाऱ्यांवर लगाम बसेल, अशी मागणी सूज्ञ नागरिकांनी केली.
नदी व विसर्जन घाटाच्या सुशोभीकरणासाठी पंचायत समितीकडे निधीची मागणी केली आहे. पावसाळ्यापूर्वी नदी स्वच्छ करण्याचे मानस आहे.
- ज्योती परकर, सरपंच
अनेक वर्षांपासून बोर्लीपंचतनमधील गणपती विसर्जन घाटाला नाल्याचे स्वरूप आले आहे. अनेक सरपंच बदलले; परंतु घाटाचे स्वरूप बदलले नाही. या ठिकाणी कचरा होऊ नये, यासाठी उपाययोजनासंदर्भात बैठकीचे नियोजन करण्याचे लेखी पत्र दिले, तरी ग्रामपंचायतीकडून कोणतेही उत्तर नाही. जर ग्रामपंचायतीने या घाटाची स्वच्छ्ता केली नाही, तर कचरा ग्रामपंचायत कार्यालयासमोर टाकण्यात येईल.
- सुशांत पाटील, मनसे तालुकाध्यक्ष, श्रीवर्धन
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81800 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..