मिरा-भाईंदरच्या खाडी किनाऱ्याला हटके लूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरा-भाईंदरच्या खाडी किनाऱ्याला हटके लूक
मिरा-भाईंदरच्या खाडी किनाऱ्याला हटके लूक

मिरा-भाईंदरच्या खाडी किनाऱ्याला हटके लूक

sakal_logo
By

भाईंदर, ता. १० (बातमीदार) : मिरा-भाईंदर क्षेत्रात घोडबंदरपासून ते उत्तनमधील चौकापर्यंत सुमारे साडेदहा किलोमीटर लांबीचा किनारा लाभला आहे. या खाडीकिनाऱ्याचा ठाण्यातील ‘वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट’च्या धर्तीवर विकास आणि सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे दीडशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, या विकासाचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित विभागाला दिले आहेत.
मिरा-भाईंदरला लाभलेल्या खाडीकिनाऱ्यापैकी घोडबंदर भागात रेती उत्खनन केले जाते आणि उत्तन भागातील बहुतांश किनारा मासेमारीसाठी वापरला जातो. या खाडीकिनाऱ्याचा ठाण्यातील खाडीकिनाऱ्याप्रमाणे विकास व्हावा आणि त्याचे सौंदर्यीकरण व्हावे, अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्याचे संकल्पचित्रदेखील तयार करण्यात आले आहे आणि त्यासाठी सुमारे १५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी तसेच कोकणातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेनेच्या प्रमुख आमदारांची बैठक सोमवारी (ता. ९) मुंबईत वर्षा निवासस्थानी घेतली. विकासकामांच्या मागण्या व सुरू असलेल्या विकासकामांवर बैठकीत चर्चा करून आढावा घेण्यात आला. त्या वेळी खाडीकिनाऱ्याच्या विकासाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

मराठा आरमाराला समर्पित
घोडबंदर ते चौकापर्यंतच्या खाडीकिनाऱ्यावर घोडबंदर आणि जंजिरे धारावी असे दोन महत्त्वाचे किल्ले आहेत. हे दोन्ही किल्ले वसई खाडीकिनाऱ्यावर आहेत. वसईच्या किल्ल्यावर नरवीर चिमाजी अप्पा यांनी मिळवलेल्या देदीप्यमान विजयश्रीमध्ये मराठा आरमाराने वसई खाडीचा वापर केला होता. ही ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन खाडीकिनाऱ्याचा विकास आणि सौंदर्यीकरण हे मराठा आरमाराला समर्पित असेल, मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष या सौंदर्यीकरणातून ठळक होइल, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.

अन्य विकासकामांबाबत कार्यवाही
मिरा-भाईंदर शहरासाठी राबवण्यात येत असलेल्या सूर्या धरण पाणी योजनेच्या शहरातील वितरण व्यवस्थेसाठी सरकारने मंजूर केलेला ४२१ कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र सरकारच्या नगरोत्थान योजनेअंतर्गत देण्याची कार्यवाही सुरू करावी. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने गुरुकुल म्हणजेच संगीत अकादमी सुरू करण्यासाठी ५० कोटी, भाईंदर पूर्व भागात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तरणतलाव उभारणीसाठी ४० कोटी, वरसावे येथे नवीन शासकीय विश्रामगृह बांधण्यासाठी २५ कोटी, फाऊंटन हॉटेलसमोरील मेरी टाईम बोर्डाच्या प्रवासी जेटीजवळ चौपाटी विकसित करण्यासाठी १० कोटी आदी निधीबाबतही कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81805 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top