
कुडूसची पाणी योजना रखडली !
वाडा, ता. १० (बातमीदार) ः तालुक्यातील कुडूस हे मोठ्या बाजारपेठेचे गाव असून येथील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येला जुनी पाणी योजना अपुरी पडत असल्याने येथे सन २०१४ मध्ये नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली. जानेवारी २०१४ मध्ये योजनेचे कामही सुरू करण्यात आले. मात्र या ना त्या कारणाने योजनेचे काम रखडले असून नऊ वर्षानंतरही या योजनेचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे आणखी काही काळ नागरिकांना पाण्याची वाट पाहावी लागणार असल्याचे दिसून येते आहे. या योजनेसाठी उभारलेल्या पाण्याच्या टाक्या, पाइपलाइन जीर्ण झाल्या आहेत.
कुडूसच्या वाढत्या लोकसंख्येला कुडूसची जुनी पाणीपुरवठा योजना अपुरी पडत होती. उपनगरांना पाणीपुरवठा न झाल्याने येथील नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. या वाढत्या तक्रारीची दखल घेऊन तत्कालीन सरपंच कुमार जाबर व उपसरपंच मिलिंद चौधरी यांनी प्रयत्न करून ५ कोटी रुपये निधीची राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली. या योजनेचे काम नाशिक येथील ठेकेदार संदेश बुटाला यांना देण्यात आले होते. तिचे भूमिपूजन मोठा गाजावाजा करत तत्कालीन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
१८ जानेवारी २०१४ साली पाणी योजनेचे काम सुरू करण्यात आले. या योजनेच्या कामासाठी दोन वर्षांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र, पहिल्यांदा पाण्याची टाकी व जलशुद्धीकरणासाठी जागाच उपलब्ध होत नसल्याने काम रखडले होते. त्यानंतर पाईपलाईन निकृष्ट दर्जाची केली असल्याचा आरोप करीत या योजनेचे काम थांबले होते. आता योजना पूर्ण झाली असून त्यासाठी विजेची मागणी करण्यात आली असून विद्युत मीटर मिळताच पाणी योजना सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र या योजनेसाठी पाईपलाईन, पाण्याच्या टाक्या तयार करण्यात आल्या असून त्याही आता जुन्या झाल्या असल्याचे दिसून येते आहे.
महावितरण कंपनीकडे पाणी योजनेच्या विद्युत मीटरसाठी अर्ज करण्यात आला आहे. त्यासाठी पैसेही भरण्यात आले आहेत. विद्युत मीटर मिळताच पाणी योजना सुरू करण्यात येईल.
- संदेश बुटाला, कंत्राटदार, पाणी योजना
पाणी योजनेचे काम पूर्ण झाले असून येत्या काही दिवसात योजना सुरू करण्यात येईल.
- अनिरुद्ध पाटील, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कुडूस
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81816 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..