झाडे मारण्यासाठी घातक रसायनाचा वापर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झाडे मारण्यासाठी घातक रसायनाचा वापर
झाडे मारण्यासाठी घातक रसायनाचा वापर

झाडे मारण्यासाठी घातक रसायनाचा वापर

sakal_logo
By

झाडे मारण्यासाठी घातक रसायनाचा वापर

कुडे गावच्या जागरूक ग्रामस्थांनी हाणून पाडला वृक्षतोडीचा प्रयत्न

घातक रसायन, ड्रिल मशीन आदी साहित्य जप्त

मनोर, ता.११ ः
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कुडे गावच्या हद्दीत महामार्गालगतच्या वन विभागाच्या मोक्याच्या भूखंडावरील स्थानिक प्रजातीच्या झाडांना ड्रिल मशीनच्या साह्याने भोक पाडून झाडांच्या खोडात घातक रसायन टाकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी (ता. ८) दुपारी घातक रसायनाचा वापर करून झाडे मारण्याचा प्रयत्न जागरूक ग्रामस्थांनी उघडकीस आणला आहे. जिवंत झाडांना ड्रिल मारणाऱ्या चार इसमांना ग्रामस्थांनी पकडून चोप देत वन विभागाच्या ताब्यात दिले. याप्रकरणी आरोपींवर अवैध वृक्षतोड केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक आरोपी फरारी असल्याची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कुडे गावच्या हद्दीत महामार्गालगत वन विभागाचा १२२ सर्व्हे क्रमांकाचा भूखंड आहे. महामार्गालगत आणि मोक्याच्या ठिकाणी असल्याने भूमाफियांकडून हा भूखंड हडपण्याचा प्रयत्न सुरू होता. या भूखंडावर असलेली झाडे तोडण्यासाठी वन विभागाकडे परवानगीसाठी अर्ज करण्यात आला होता; परंतु झाडे तोडीला स्थानिक ग्रामस्थ आणि वन व्यवस्थापन समितीने आक्षेप घेतल्याने वन विभागाने वृक्षतोडीला परवानगी नाकारली होती. अनेक प्रयत्न करून वन विभागाचा मोक्याच्या ठिकाणी असलेल्या भूखंडावरील वृक्षतोड करता येत नसल्याने भूखंड भूमाफियांनी घातक रसायनाचा वापर करून झाडे मारण्याचा प्रयत्न केला आहे.


वन विभागाच्या भूखंडावरील झाडांची कत्तल करण्यासाठी रविवारी सकाळी चार जण कुडे दाखल झाले होते. त्यांना कुडे गावातील एका स्थानिक व्यक्तीने इलेक्ट्रिक ड्रिल मशीनसह अन्य साहित्य उपलब्ध करून दिले होते. आरोपींनी भूखंडालगतच्या महावितरणच्या वीजवाहिनीवर आकडा टाकून बेकायदेशीर आणलेल्या वीजमीटरला वीज जोडणी करून इलेक्ट्रिक मशीन सुरू केली होती. ड्रिल मशीनच्या साह्याने पंधरा ते वीस झाडांना भोक पाडून झाडांच्या खोडात घातक रसायन टाकण्याचे काम सुरू केले होते. भूखंडावर चार इसमांची हालचाल संशयास्पद वाटल्याने दुपारच्या वेळी ग्रामस्थांनी आरोपींना हटकले असता आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. बेकायदेशीरपणे स्थानिक प्रजातीची झाडे मारण्याचे काम भूमाफियांकडून सुरू असल्याचे लक्षात येताच संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी चार आरोपींना पकडून चोप दिला. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करून ड्रिल मशीन, घातक रसायन आदी साहित्यासह चारही आरोपींना वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले.

अवैध वृक्षतोड प्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक आरोपी फरारी असून तपास सुरू असल्याची माहिती दहिसरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी नम्रता हिरे यांनी दिली.

प्रतिक्रिया,
कुडे गावातील महामार्गालगतचा वन विभागाचा भूखंड हडप करण्याचा प्रयत्न स्थानिक दलालांच्या मदतीने भूमाफियांकडून सुरू आहे. रविवारी चार इसमांनी बेकायदेशीरपणे वन विभागाच्या भूखंडावरील झाडांना भोकं पाडून रसायन टाकले आहे. दिवसा-उजेडात झाडे मारण्याचे काम सुरू असताना वन विभागाचे कर्मचाऱ्यांकडून होत असलेले दुर्लक्ष गंभीर आहे. वन विभागाचा भूखंड भूमाफियांना कदापि हडप करू देणार नाही.
- बाबुराव भोवर, ग्रामस्थ, कुडे.


प्रतिक्रिया,
कुडे गावात रविवारी वृक्षतोड करण्यासाठी वापरण्यात आलेला वीजमीटर महावितरण कंपनीकडून देण्यात आलेला नाही. बेकायदेशीर वीजजोडणी आणि वीजमीटर वापरल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
अक्षदा बारस्कर,
अभियंता, महावितरण.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81821 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top