
घनकचऱ्याची बेकायदेशीर विल्हेवाट
मनोर, ता. १० (बातमीदार) ः घातक रासायनिक घनकचऱ्याची बेकायदा विल्हेवाट लावल्याप्रकरणी तारापूरच्या औद्योगिक वसाहतीमधील कॅलिक्स केमिकल अँड फार्मास्युटिकल्स कंपनीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी आपल्या कंपनीच्या आवारातच घातक रासायनिक घनकचरा साठवलेले ड्रम खड्डा खोदून जमिनीत गाडून ठेवत बेकायदेशीर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता. सोमवारी दुपारी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करून घातक रसायनाचे नमुने ताब्यात घेतले असून कंपनीवर कारवाईचा प्रस्ताव पाठवला आहे.
तारापूर औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कारखान्यांमधून निघणाऱ्या घातक रासायनिक घनकचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीकडे पाठविण्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने निर्देश आहेत. तळोजा येथे घातक घनकचरा पाठविण्यासाठी वाहतूक आणि वाहनभाडे आदी खर्चिक प्रक्रिया पार पडावी लागते. त्यामुळे तारापूर औद्योगिक वसाहतीमधील अनेक प्रदूषणकारी कारखाने छुप्या मार्गाने घातक रासायनाची बेकायदेशीर विल्हेवाट लावत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
कॅलिक्स केमिकल अँड फार्मास्युटीकल्स लिमिटेड कंपनी छुप्या पद्धतीने बेकायदेशीरपणे विल्हेवाट लावलेल्या घातक रसायनांच्या साठ्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाला मिळाल्यानंतर उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या मदतीने कंपनीच्या आवारातील जागेचे खोदकाम सुरू केले होते.खोदकाम दरम्यान घातक रसायनाने वितळलेले प्लास्टिक ड्रम आणि उग्र वास असलेला रासायनिक घनकचरा आढळून आला. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून रासायनिक घनकचऱ्याचे नमुने ताब्यात घेत तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
कॅलिक्स केमिकल आणि फार्मास्युटिकल्स लिमिटेड या कंपनीवर उत्पादन बंदीची कारवाईचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठविण्यात आला आहे. लवकर कंपनीला उत्पादन बंदीची कारवाई केली जाणार आहे.
- प्रशांत गायकवाड, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81823 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..