
पाणथळ, कांदळवनांमुळे फ्लेमिंगोंचा उरणमध्ये मुक्काम
उरण, ता. १० (वार्ताहर) ः उरण परिसरात पाणथळ क्षेत्र, जलाशये, खाडी किनारे, कांदळवनांमुळे फ्लेमिंगोंची संख्या वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांत लाखोंच्या संख्येने फ्लेमिंगो दाखल झाले असून त्यांच्या निरिक्षणासाठी अभ्यासकांची गर्दी होत आहे.
उरण परिसरातील पाणजे, डोंगरी, बेलपाडा, दास्तान फाटा, रांजणपाडा, जसखार, बीपीसीएल परिसर, नवीन-शेवा आदी ठिकाणी पाणथळी जागेबरोबरच कांदळवनांचे क्षेत्र मोठे आहे. खोपटा खाडी किनारीही आता विविध प्रजातींच्या पक्ष्यांची गर्दी वाढली आहे. यामध्ये नीलबदक, पाणकोंबड्या, पाणकावळे, बगळे, सफेद व काळे करकोच, खंड्या, शेकाट्या, पाणटिवळा, सारस आदी जलचर पक्ष्यांबरोबरच ऑस्टेलिया, सैबेरिया, रशिया, युरोप, आशिया खंडातील हजारो मैल प्रवास करणाऱ्या फ्लेमिंगो, पेलिकन, करकोचा, सिगल आदी स्थलांतरित पक्ष्यांचाही समावेश आहे.
बदलणाऱ्या हवामानामुळे उरण परिसरात मोठ्या संख्येने दिसणाऱ्या फ्लेमिंगों दाखल झाले आहेत. स्थलांतरित पक्ष्यांना बेडूक, मासे, कृमी, कीटक, शेवाळ, खुबे आदी आवडते खाद्य विपुल प्रमाणात उपलब्ध होऊ लागल्याने त्यांचा मुक्काम वाढल्याचे पक्षीप्रेमींकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्या उरण परिसरातील विविध खाड्या, जलाशये, किनारे फ्लेमिंगों व विविध प्रकारच्या जलचर पक्ष्यांच्या थव्यानी गजबजले आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81824 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..