
वाढत्या उन्हाचा पक्ष्यांनाही फटका
वाशी, ता. १० (बातमीदार) : कधी अवकाळी पाऊस, तर कधी उष्म्याचा वाढता तडाख्याचा माणसांना त्रास होतो, तसा पक्ष्यांनाही त्रास अधिक पटीने होत आहे. वाढत्या तापमानात उडताना पक्ष्यांच्या पोटात पाण्याचे प्रमाण कमी होऊन हवेत उडताना पक्षी खाली कोसळण्याचे प्रकार नवी मुंबईत घडत आहेत.
शरीरातील पाणी कमी होत असल्याने उडताना पडण्याचा धोका बदलत्या हवामानामुळे सध्या ऋतुचक्रातही बदल झाले आहेत. नवी मुंबईतील तापमान ३२ ते ३६ अंश इतके आहे. निसर्गात होणाऱ्या या बदलत्या हवामानाचा फटका पक्ष्यांना बसत असल्याचे दिसून येत आहे. पक्ष्यांच्या पोटात पाण्याचे प्रमाण कमी होऊन हवेत उडताना पक्षी गळून कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. पक्षी उष्ण रक्ताचे असून त्यांच्या शरीराचे तापमान १०४ ते १०५ अंश सेल्सिअस इतके असते.
शरीरातील उष्णतेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी पक्षी पंख पसरवून तोंडाने श्वसनक्रिया करतात. त्यामुळे ते उन्हाळ्यात बऱ्याचदा आपली चोच उघडून बसलेले असतात. त्यांचे शरीर अनेक पिसांनी आच्छादलेले असले तरी दुपारच्या वेळेत त्यांच्या शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढते. अशा वेळी त्यांच्या शरीराची ऊर्जा कमी होते आणि ते गळून पडतात. असा प्रकार नवी मुंबईत जास्त प्रमाणात घडत असल्याचे निसर्गप्रेमी अॅड. विशाल मोहिते यांनी सांगितले.
पक्षीदया महत्त्वाची
पोटातील पाण्याचा अंश कमी झाला की हवेत उडताना पक्षी खाली कोसळतात. रस्त्यात एखादा पक्षी मूर्छित होऊन पडलेला असेल किंवा जखमी असेल, तर अशा पक्ष्यांना सावलीच्या ठिकाणी ठेवून शक्य झाल्यास टरबूज वा कलिंगडासारखी फळे खायला द्यावीत. पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे, यासाठी बाल्कनी, गच्ची अथवा जिथे शक्य आहे, त्या ठिकाणी पाणवठे तयार करावेत, असे आवाहन निसर्गप्रेमी सागर कांबळे यांनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81829 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..