निवडणुकीत चौदा गावांना फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवडणुकीत चौदा गावांना फटका
निवडणुकीत चौदा गावांना फटका

निवडणुकीत चौदा गावांना फटका

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १० : ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये नवी मुंबई महापालिकेलगतच्या १४ गावांना वेशी बाहेरच राहावे लागणार आहे. बहुसदस्यीय पद्धतीने होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी याआधीच प्रभाग रचना तयार झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर तातडीने निवडणुका घेताना १४ गावांचा प्रभाग रचनेत समावेश करणे वेळखाऊ ठरणार आहे. त्यामुळे या गावांचा समावेश न करताच निवडणूका घेण्याची तयारी प्रशासनातर्फे सुरू आहे.
नवी मुंबई महापालिकेची मुदत २०२० च्या मे महिन्यात संपली आहे. त्याकरिता तेव्हा एक सदस्यीय पद्धतीने निवडणुकीसाठी आवश्यक तयारी निवडणूक विभागाने केली होती. परंतु मार्च २०२० मध्ये शहरात कोविडने शिरकाव केल्यामुळे निवडणूक लांबणीवर पडली. त्यानंतर निवडणूक आयोगाने आयुक्तांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. दोन वर्षे उलटूनही नवी मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या माध्यमातूनच सुरू आहे. दरम्यानच्या काळात नवी मुंबई महापालिका निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. त्यानुसार प्रभाग रचना तयार करण्यात आल्या. नव्या प्रभागांमुळे महापालिकेच्या १११ प्रभागांमध्ये वाढ होऊन आता १२२ नगरसेवक संख्या तर ४३ इतके प्रभाग झाले आहेत. या पद्धतीने निवडणूक होत असतानाच ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने पुन्हा निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उभे झाले.
निवडणुकीच्या प्रभाग रचना तयार करण्याचे अधिकार राज्य सरकारने एक विशेष विधेयकाला मंजुरी देत निवडणूक आयोगाकडून स्वतःला घेतले. त्यामुळे प्रभाग रचना तयार करण्याच्या हेतूने निवडणुकांना नाहक दिरंगाई केली. या काळात सर्वोच्च न्यायालयाने थेट ओबीसी आरक्षणाशिवाय तत्काळ निवडणूक घेण्याचे आदेश राज्‍य सरकारला दिले आहे. त्यानुसार येत्या आठवडाभरात निवडणूक आयोगाला निवडणुकीचा वेळापत्रक जाहीर करावा लागणार आहे.
निवडणूक पार पाडण्यासाठी ४५ दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. मात्र पावसाळा जवळ आल्‍याने निवडणूक आयोगाला तत्काळ निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा लागण्याची शक्यता आहे. परंतु नवी मुंबईलगतच्या १४ गावांचा समावेश करायचे झाल्यास आयोगाला पुन्हा या गावांचे प्रभाग तयार करावे लागणार आहे. आधीचे प्रभाग तयार असताना पुन्हा १४ गावांचे प्रभाग तयार करायला आयोगाला अवधी लागणार आहे. ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने या १४ गावांचा समावेश करण्याचा विचार आयोगाला महागडा ठरण्याची शक्यता आहे.

१४ गावांची अधिसूचना नाही
नवी मुंबई पालिकेलगतच्या १४ गावांचा समावेश करण्याबाबत अद्याप राज्य सरकारने अधिसूचना जाहीर केलेली नाही. त्यामुळे निवडणूक विभागाला या १४ गावांचा महापालिका निवडणुकीत समावेश करण्यासाठी अडथळा येणार आहे. तसेच निवडणूक आयोगाकडूनही प्रभाग रचना तयार करताना बहुसदस्यीय पद्धतीने करावी लागणार आहे. आता बहुसदस्यीय पद्धतीने निवडणूक करताना या गावांचा विचार केल्यास आणखी विलंब होईल. त्‍यामुळे निवडणुकीत १४ गावे बाहेरच राहण्याची शक्यता आहे.


महापालिकेने बहुसदस्य पद्धतीने केलेली प्रभाग रचना चुकीचे आहे. ऐरोलीमध्ये २५ हजार मतदारांचा पॅनेल बनवला आहे. तर बेलापूरमध्ये ३० हजार मतदारांचा प्रभाग बनवला आहे. त्यातच आता १४ गावे समाविष्ट करण्याचे नगरविकास मंत्र्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने प्रभाग रचना होणे अपेक्षित आहे.
- अशोक गावडे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

महापालिका निवडणूक लवकरात लवकर होणे अपेक्षित आहे. पण महाविकास आघाडी सरकारकडून त्या लांबणीवर टाकण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. निवडणुका न झाल्यामुळे नागरिकांचे प्रभागातील कामे रखडले आहे. १४ गावांना नवी मुंबईत समाविष्ट करून त्यांची प्रक्रिया पूर्ण करून त्यासाठी पुन्हा वेळ जावा यासाठी महाविकास आघाडी सरकारने हा खोडा घातला आहे.
- रामचंद्र घरत, जिल्हाध्यक्ष, भाजप

सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यामध्ये निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याचे आदेश दिले असले तरी निवडणुका सप्टेंबरनंतर लागण्याची शक्यता आहे. तो पर्यंत सरकारने व पालिकेने १४ गावांच्या समावेशाची प्रक्रिया पूर्ण करावी. निवडणुकांच्या तारखा जाहीर होईपर्यंत १४ गावांच्या समावेशाची प्रक्रिया पूर्ण झाल्यास प्रभाग रचना करताना कोणतीच अडचण येणार नाही.
- विठ्ठल मोरे, शिवसेना, जिल्हाप्रमुख

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81832 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top