
वडिलांच्या निधननंतर नेत्र आणि त्वचादान
वसई, ता. १० (बातमीदार) ः मृत्यूनंतर मानवाच्या देहाची राख होत असते. त्यामुळे मानवी अवयवाचा फायदा इतरांना व्हावा म्हणून अविनाश कुसे यांनी त्यांचे वडील प्रफुल्ल मनोहर कुसे यांच्या निधनानंतर नेत्रदान व त्वचादान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे समाजासमोर आदर्श निर्माण झाल्याची भावना समाजातून व्यक्त होत आहे.
मनोहर कुसे (वय ७४) यांचे हृदयविकाराच्या आजाराने वसईच्या राहत्या घरी सोमवारी (ता. ९) निधन झाले. या वेळी अविनाश कुसे व कुटुंबीयांनी वडिलांची त्वचा व नेत्रदान करण्याचा एकमताने निर्णय घेतला. त्यानंतर द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील पवार यांच्याशी त्यांनी संपर्क साधला. त्वरित नॅशनल बर्व सेंटर, ऐरोली या त्वचा बँकेला व बच्चूअली आय बँकेच्या सहकाऱ्यांना बोलावण्यात आले आणि त्वचा व नेत्रदानाची प्रक्रिया पार पडली. या निर्णयामुळे डोळ्यातील कॉर्नियातून चार अंधत्व आलेल्या व्यक्तींना जग पाहता येणार आहे. तर भाजलेल्या निदान तीन व्यक्तींना त्वचेचा फायदा मिळणार आहे.
अविनाश कुसे, त्यांची पत्नी प्रज्ञा कुसे व मुलगा अथर्व यांनी याअगोदरच मृत्यूनंतर त्वचा व नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला होता. वडिलांना रक्ताची नितांत गरज होती; मात्र ते मिळवताना दमछाक झाली. रक्ताचा तुडवडा किती मोठ्या प्रमाणात आहे, याची जाणीव कुसे कुटुंहीयांना झाली. त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. याच वेळी मृत्यूपश्चात नेत्रदान, त्वचादान करण्याचा निश्चय केला. मनोहर कुसे यांच्या पत्नी रोहिणी कुसे यांनीदेखील देहदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
------------------------------------
मृत्यूनंतरदेखील शरीरातील अवयवांचा उपयोग अनेकांना होतो. रुग्णांना जगण्याची नवी उमेद निर्माण होत असते. त्यामुळे गैरसमज दूर लोटून नागरिकांनी अवयव, देहदानासाठी पुढे आले पाहिजे.
- अविनाश कुसे
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81844 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..