प्रसिद्ध संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रसिद्ध संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन
प्रसिद्ध संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन

प्रसिद्ध संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन

sakal_logo
By

सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. १० ः संतूर वाद्याला जागतिक ओळख मिळवून देणारे प्रसिद्ध ज्येष्ठ संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा (वय ८४) यांचे आज सकाळी त्यांच्या वांद्रे- पाली हिल येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी मनोरमा, दोन मुलगे रोहित आणि राहुल तसेच सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत उद्या (ता. ११) दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी जुहू येथील अभिजित सोसायटीमध्ये सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

पंडित शिवकुमार शर्मा यांनी काश्मीरमधील संतूर वाद्याला संगीत क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करून दिली. भारतीय संगीतातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. शिवकुमार शर्मा हे गायकही होते. निर्माते व दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या ‘झनक झनक पायल बाजे’ गाण्याला त्यांनी संगीत दिले होते. प्रसिद्ध बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि शिवकुमार शर्मा यांची जोडी हिंदी चित्रपटसृष्टीत खूप गाजली. त्यांनी ‘शिव-हरी’ नावाने अनेक चित्रपटांना संगीत दिले होते. १९६७ मध्ये त्यांनी हरिप्रसाद चौरसिया आणि गिटारवादक ब्रिजभूषण काबरा यांच्यासमवेत काढलेली ‘कॉल ऑफ द व्हॅली’ ध्वनिमुद्रिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. ‘सिलसिला’ (१९८०), ‘फासले’ (१९८५), ‘चांदणी’ (१९८९), ‘लम्हें’ (१९९१) आणि ‘डर’ (१९९३) चित्रपटांना ‘शिव-हरी’ जोडीने संगीत दिले होते. त्यांच्या सर्वच चित्रपटांचे संगीत हिट ठरले होते. त्यांना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १९८६ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, १९९१ मध्ये पद्मश्री आणि २००१ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

शिवकुमार शर्मा गेले काही महिने आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते; परंतु आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय मंडळींबरोबरच मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांचे शिष्यगण आज त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी वांद्रे येथील त्यांच्या घरी गेले होते. त्या वेळी त्यांना शोक अनावर झाला होता. उद्या (ता. ११) त्यांचे पार्थिव जुहू रोड नं. ४९ येथील अभिजित को-ऑप. हौसिंग सोसायटीमध्ये सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81856 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top