सत्तेत वाटा मिळाला नाही तर आघाडीला सोडचिठ्ठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सत्तेत वाटा मिळाला नाही तर आघाडीला सोडचिठ्ठी
सत्तेत वाटा मिळाला नाही तर आघाडीला सोडचिठ्ठी

सत्तेत वाटा मिळाला नाही तर आघाडीला सोडचिठ्ठी

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. १० (बातमीदार) ः महाराष्ट्रात रिपब्लिकन ऐक्य हीच काळाची गरज आहे. त्यासाठी रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी हातमिळवणी करून पुढाकार घ्यावा. आंबेडकर यांच्याशिवाय ऐक्य अशक्य आहे. हे दोन्ही नेते एक झाल्यास आपला पक्ष ऐक्यात विलीन करू, अशी ग्वाही पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दिली. ते उल्हासनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सत्तेतील ५ टक्के वाटा मिळाला नाही, तर महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देऊ. नवीन समविचारी राजकीय पक्षांसोबत मोर्चेबांधणी करू, असा इशाराही कवाडे यांनी दिला.

पीआरपीचे ठाणे जिल्हाध्यक्ष व उल्हासनगरातील माजी नगरसेवक प्रमोद टाले यांच्या पुढाकाराने टाऊन हॉलमध्ये पक्षाची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी कवाडे यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर मतप्रदर्शन केले. जर नवनीत राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो, तर जातीय तेढ निर्माण करणारे राज ठाकरे यांच्यावर का नाही? ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बंधू असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत नाही का, असा सवाल प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी उपस्थित केला आहे. कोणत्याही धर्मापेक्षा देशाचे संविधान सर्वात मोठे आहे; मात्र धर्मा-धर्मामध्ये, जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करून त्याचा राजकीय फायदा मनसे व भाजपा घेत आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवूनदेखील भाजप सत्तेत न येऊ शकल्याने या पक्षाचे नेते अस्वस्थ झाले असून त्यामुळे भाजपकडून राज ठाकरे यांचा प्याद्यासारखा वापर केला जात आहे, असे कवाडे म्हणाले.
या वेळी राष्ट्रीय पीआरपीचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, आयोजक प्रमोद टाले, गणेश उन्हावणे, जगन सोनवणे, चरणदास इंगोले, रत्ना मोहोड, विलास राऊत, संतोष रोकडे, सुनील सोनवणे, पुष्पा ससाणे, उत्तम भंगाळे, देविदास निकम आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------------
या वेळी कवाडे यांनी ओबीसी आरक्षणाविषयी मत मांडले. ओबीसींना आरक्षण मिळालेच पाहिजे, या मतावर आपण ठाम आहोत. जिथून ओबीसी निवडून येतात, त्या जागा त्यांना सोडाव्यात, असे ते म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81859 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top