
हरकती घेण्यासाठी पाच दिवसांचा कालावधी
अंबरनाथ, ता. १० (बातमीदार) ः नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंबरनाथ नगरपालिकेत प्रभाग रचनेची कामे सुरू करण्यात आली आहेत. पालिकेने जी प्रभाग रचना तयार केली आहे, ती प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यांच्यावर हरकती घेण्यासाठी अवघ्या पाच दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
अंबरनाथ नगरपालिकेची मुदत एप्रिल २०२० मध्ये संपुष्टात आली होती. मात्र, त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने तब्बल दोन वर्षे पाकिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊ शकली नाही. त्यातच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आल्याने निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. आता सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश देताच राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेच्या कामाला प्रारंभ केला आहे. अंबरनाथ नगरपालिकेने प्रभाग रचना तयार केल्या असून या प्रभाग रचनांवर हरकती नोंदवण्यासाठी १० मे ते १४ मे २०२२ ही मुदत निश्चित केली आहे. प्रभाग रचना निश्चित करताना मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप झाल्याने अनेक प्रभाग फोडताना त्यामध्ये त्रुटी ठेवण्यात आल्या आहेत. त्याचा अभ्यास करून हरकती घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांना मुबलक कालावधी मिळणे अपेक्षित होते; मात्र हा अवधी अवघ्या पाच दिवसांचा देण्यात आल्याने प्रभाग रचनेचा अभ्यास करून हरकती नोंदवणे अवघड झाले आहे.
प्रत्येक राजकीय पक्ष प्रभाग रचनेचा अभ्यास करून त्यावर हरकती नोंदवण्याचे काम करणार आहेत. या हरकतींवर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात येणार असून त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रभाग रचना निश्चित करण्यात येणार आहे. पॅनल पद्धतीने प्रभाग रचना तयार करण्यात आल्याने या प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर आरक्षण सोडत पार पडणार आहे. या आरक्षण सोडतीनंतरच राजकीय हालचालींना वेग येणार आहे. प्रभाग रचना निश्चित करणे आणि त्यानंतर आरक्षण सोडत पार पडल्यानंतर मतदार यादी निश्चित होईपर्यंत या निवडणुकीला तीन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. निवडणुकीपूर्वीची कार्यप्रणाली राबवण्यासाठी लागणाऱ्या कालावधीचा विचार करता अंबरनाथ पालिकेची निवडणूक सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81860 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..