
राणांना महापालिकेची नोटीस
मुंबई, ता. १० ः हनुमान चालिसा प्रकरणातून नुकताच जामीन मिळाल्यानंतर आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या खार येथील निवास्थानावर मुंबई महापालिकेकडून लवकरच कारवाईची शक्यता आहे. अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी राणा दाम्पत्याला मुंबई महापालिकेच्या एच-पश्चिम विभागाकडून आज (ता. १०) नोटीस बजावण्यात आली. नोटिशीला सात दिवसात उत्तर देण्याचेही महापालिकेने म्हटले आहे.
खार पश्चिम येथे लॅव्ही इमारतीमध्ये आठव्या मजल्यावर राणा दाम्पत्याची सदनिका आहे. मंजूर आराखड्याशिवाय सदनिकेत केलेल्या अनधिकृत बदलांप्रकरणी राणा दाम्पत्याला महापालिकेने नोटीस पाठवत सात दिवसांची मुदत दिली आहे. तसेच सात दिवसांमध्ये हे बांधकाम हटवण्यात किंवा पाडण्यात का येऊ नये, याचे उत्तर द्यावे, असेही नोटीशीत म्हटले आहे. मुंबई महापालिका कायद्यान्वये त्यांना आज कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. सदनिकेत केलेल्या अनधिकृत बांधकामासाठी पुरेसे कारण सिद्ध न केल्यास पालिकेकडून बांधकाम हटवण्याची किंवा पाडण्याची कारवाई करण्यात येईल. तसेच या कारवाईसाठी येणारा खर्चही राणा दाम्पत्याकडून वसूल करण्यात येईल, असे पालिकेने नोटीशीत स्पष्ट केले आहे.
---
पालिकेला काय आढळले?
मुंबई महापालिकेच्या एच पश्चिम विभागाच्या पथकाने सोमवारी राणा दाम्पत्याच्या सदनिकेची पाहणी केली होती. त्यावेळी केलेल्या पाहणीत लिफ्ट सदनिकेत घेणे, पूजा घर किचनमध्ये घेणे, लिव्हिंग रूम तयार करणे, लॉबीतील भाग राहण्यासाठी वापरणे, बेडरूमला छताचा भाग जोडणे, छताच्या भागाचा वापर बाल्कनीसाठी करणे, लिव्हिंग रूमला किचन आणि बेडरूममध्ये रूपांतरीत करणे तसेच दोन बेडरूम एकत्र करणे आदी बदल आढळून आले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81866 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..