
पनवेल रेल्वे टर्मिनस २०२३ पर्यंत पूर्ण
दीपक घरत ः सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. ११ : मुंबई महानगरातील रेल्वे सेवेवर पडणारा ताण कमी करण्याच्या उद्देशाने पनवेलमध्ये रेल्वे टर्मिनस उभारण्यात येत आहे. या टर्मिनसचे ७५ टक्के काम पूर्ण झाले असून, २०२३ पर्यंत उर्वरित काम पूर्ण होईल, असा दावा रेल्वे अधिकाऱ्यांनी केला. हे काम पूर्ण होताच या टर्मिनसवरून मध्य रेल्वेला नव्याने रेल्वे धावणे शक्य होणार आहे; तर हे टर्मिनस कोकण रेल्वे आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी प्रमुख केंद्र बनणार आहे.
पनवेल येथे रेल्वे टर्मिनस विकसित करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनामार्फत २०१६-१७ साली घेण्यात आला होता. यामुळे प्रवाशांना लोकमान्य टिळक टर्मिनस, छत्रपती शिवाजी टर्मिनस, अथवा मुंबई परिसरातील इतर रेल्वे टर्मिनसवर न जाता पनवेल टर्मिनसवरूनच बाहेर जाणाऱ्या रेल्वेतून प्रवास करणे शक्य होणार आहे. नवी मुंबई परिसरातील पनवेलमधील हा रेल्वेचा पहिला टर्मिनस बनणार असल्याने प्रवाशांना एकाच ठिकाणाहून प्रवास करणे सोपे होईल. त्याचबरोबर बाहेरगावी विशेषतः दक्षिण भागात, तसेच कोकणपट्ट्यात जाणाऱ्या भविष्यात पनवेल टर्मिनसमधून सोडण्यात येणार आहेत. सध्या कोकणात जाणाऱ्या २० गाड्या धावत आहेत. भविष्यात यात वाढ होऊन अतिरिक्त चार ते पाच गाड्या पनवेलमधून सुटणार आहेत. मध्य रेल्वेच्या २४ डब्यांच्या नवीन गाड्यादेखील पनवेल टर्मिनसमधून सुटणार आहेत. कोकण रेल्वेचे संपूर्ण विद्युतीकरण झाल्यानंतर या टर्मिनसचे काम वेळेत पूर्ण झाल्यास प्रवाशांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
२६ डब्यांच्या रेल्वेकरिता प्लॅटफॉर्म
पनवेल येथील नवीन टर्मिनसवर २६ डब्यांच्या रेल्वेकरिता नवीन प्लॅटफॉर्म असणार आहे. एक फूट ओव्हरब्रीज, सहायक सुविधांसह १,५०० चौरस मीटरची नवीन स्थानकाची इमारत यांचा समावेश आहे.
कळंबोलीमध्ये देखभाल शेड
रेल्वेमार्फत कळंबोली येथे देखभाल शेड तयार करण्यात येत आहे. या देखभाल शेडमध्ये चार वॉशिंग-कम-पिट लाईन्स, २६ डब्यांच्या लांबीच्या दोन स्टेबल लाईन आणि १३० मीटर बाय १० मीटर शेडच्या देखभालीव्यतिरिक्त २६ डब्यांच्या गाड्यांसाठी मार्गिकेची तरतूद आहे. पनवेल टर्मिनस आणि कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्सच्या दोन्ही बाजूंना आवश्यक कनेक्टिव्हिटीसह वेगळ्या तिसऱ्या लाईनने जोडल्या जाणार आहेत, जेणेकरून सध्याच्या कार्यरत रहदारीला अडथळा होणार नाही.
दोन हेक्टर जागा घेणार
पनवेल आणि कळंबोलीदरम्यान लहान पुलांचे काम पूर्ण झाले आहे. कळंबोली येथे देखभाल शेड आणि स्टेशन इमारत पूर्ण झाली आहे आणि डेक स्लॅबच्या कामाच्या पायाभरणीचे काम सुरू आहे. स्थानकाच्या आजूबाजूची जमीन सिडकोकडे असल्याने त्याच्याशी त्रिपक्षीय करार अंतिम टप्प्यात आहे. तसेच, डेक स्लॅब आणि रॅम्प उभारण्यासाठी सिडकोकडून १.९२ हेक्टर जमीन घेणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81890 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..