जप्तीच्या वस्‍तूंपोटी भरले २६ कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जप्तीच्या वस्‍तूंपोटी भरले २६ कोटी
जप्तीच्या वस्‍तूंपोटी भरले २६ कोटी

जप्तीच्या वस्‍तूंपोटी भरले २६ कोटी

sakal_logo
By

जप्तीच्या वस्‍तूंपोटी भरले २६ कोटी
सिडको कार्यालयातील खुर्च्या-टेबल, संगणक, पंखे मिळाले परत

नवी मुंबई, ता. ११ (वार्ताहर) : संपादित जमिनीच्या नुकसानभरपाईपोटीची सुमारे २६ कोटींची वाढीव रक्कम सिडकोने न्यायालयात जमा केल्यानंतर अलिबाग येथील सह दिवाणी न्यायालयाने सिडकोचे जप्त केलेले शेकडो संगणक, खुर्च्या, कपाटे, पंखे, टेबल, फॅक्स मशीन आदी मालमत्तांची सुटका केली. त्यामुळे गेले महिनाभर या वस्‍तूंअभावी सिडको कर्मचाऱ्यांमध्ये उडालेला गोंधळ थांबला आहे. सिडको अधिकारी, कर्मचारी जागेवर सापडत नसल्याने नागरिकांची कामेदेखील खोळंबली होती.
उरणच्या करळ गावातील ओंकार ठाकूर यांची ३४ गुंठे जमीन संपादनापोटी वाढीव नुकसानभरपाई म्हणून १ कोटी ५४ लाख, तर वडघर येथील धाया माया मुंडकर यांना सुमारे साडेचार एकर जमीन संपादनापोटी वाढीव नुकसानभरपाईची सुमारे २६ कोटी इतकी रक्कम जमा करण्याचे आदेश न्यायालयाने सिडकोला दिले होते. मात्र सिडकोने या रक्कमेचा भरणा न केल्याने न्यायालयाने सिडकोच्या मालमत्तेवर दोनदा टाच आणली.
मालमत्ता जप्तीची नोटीस बजावूनही सिडको व्यवस्थापनाकडून भूधारकांना वेळेत नुकसानभरपाई दिली जात नसल्याने अखेर न्यायालयाने जप्तीच्या कारवाईची अंमलबजावणी केली होती. या कारवाई अंतर्गत सिडको कार्यालयातील २ हजार संगणक, ३ हजार खुर्च्या, ५०० कपाटे, ५०० पंखे जप्त करण्याचे आदेश अलिबाग येथील सह दिवाणी न्यायालयाने दिले होते.
कारवाईदरम्यान सिडको अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सिडकोतील दालने कुलूप बंद करण्यास सुरुवात केल्याने न्यायालयाच्या बेलिफने मिळेल तितके साहित्य जप्त करून न्यायालयात जमा केले होते. इतक्यावरच न थांबता सिडकोचे बँक खाते गोठवून भूधारकांचे पैसे वसूल करण्यासाठी भूधारकांचे वकील ॲड. चंद्रशेखर वाडकर यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
गेली अनेक वर्षे वाढीव नुकसानभरपाईची रक्कम मिळावी म्हणून प्रकल्पग्रस्त शेतकरी सिडकोच्या दारात खेटे मारत होते. मात्र सिडको अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे त्रस्‍त शेतकऱ्यांनी अखेर न्यायालयात धाव घेतली; परंतु न्यायालयाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवल्‍याने सिडकोवर जप्तीची कारवाई करण्यात आली.

महिनाभरात सव्वा दोनशे कोटी जमा
जप्ती वॉरंट बजावल्‍यानंतर दोन्ही प्रकरणांत बाळकृष्ण ठाकूर यांना वाढीव नुकसानभरपाईपोटी सिडकोने १ कोटी ६० लाख १५ हजार ९४६ रुपये; तर धाया माया मुंडकर प्रकरणात सिडकोने २४ कोटी ५३ लाख ३२ हजार ५५९ रुपये ५ मे रोजी न्यालयात जमा केले. इतकेच नव्हे तर वाढीव नुकसानभरपाईपोटीच्या १३० प्रकरणांत सिडकोने चालू महिन्यात तब्बल सव्वा दोनशे कोटी रुपये न्यायालयात जमा केल्याची माहिती सिडकोच्या सूत्रांनी दिली.

सिडकोच्या मालमत्‍‌तेवर टाच
कारवाई अंतर्गत बाळकृष्ण भास्कर ठाकूर यांच्या स्पेशल दरखास्त प्रकरणात भिंतीवरील फॅन (६), स्टॅण्ड फॅन (४), टेबल लाकडी, रॅक (६), टेबल लोखंडी (३), खुर्च्या (४७), ऑफिसर खुर्च्या (३), लोखंडी कपाट (१), संगणक संपूर्ण सेट (५), फॅक्स मशीन (१), झेरॉक्स मशीन (१) आदी सिडकोची मालमत्ता २५ मार्च रोजी जप्त करण्यात आली होती.

धाया माया मुंडकर यांच्या स्पेशल दरखास्त प्रकरणात कोर्टाने ८ एप्रिल २०२२ रोजी बजावलेल्या वॉरंटप्रमाणे सिडकोच्या मालमत्ता जप्तीची कारवाई केली. या कारवाई अंतर्गत लाकडी मोठी कपाटे (२), चार दरवाजावाली कपाटे (७), तीन दरवाजेवाली कपाटे (१७), दोन दरवाजेवाली कपाटे (६), टेबल फॅन (४), वॉल फॅन (८), मॉनिटर (६४), संगणक सेट (१), की-बोर्ड (५३), माऊस (५२), खुर्च्या (१४३) आदी सिडको मालमत्तेवर टाच आणली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81900 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top