मिरा-भाईंदर भाजपमधील गटबाजी रोखण्याचे आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरा-भाईंदर भाजपमधील गटबाजी रोखण्याचे आव्हान
मिरा-भाईंदर भाजपमधील गटबाजी रोखण्याचे आव्हान

मिरा-भाईंदर भाजपमधील गटबाजी रोखण्याचे आव्हान

sakal_logo
By

प्रकाश लिमये : सकाळ वृत्तसेवा

भाईंदर, ता. ११ : मिरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीला अवघे काही महिनेच शिल्लक राहिले असले तरी भाजपमधील अंतर्गत गटबाजी शमण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. मिरा-भाईंदरची जबाबदारी देण्यात आलेले विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ही गटबाजी संपवण्याचे दोन वेळा प्रयत्न केले; मात्र त्यांनाही अद्याप यश आलेले नाही. भाजपमधील या गटबाजीचा आगामी निवडणुकीवर चांगलाच परिणाम होण्याची शक्यता आहे.
मिरा-भाईंदरमधील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी (ता.८) आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रवीण दरेकर उपस्थित होते. मात्र या मेळाव्यावरही माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यासह त्यांच्या गटातील बहुतांश नगरसेवकांनी बहिष्कार टाकला. महापालिकेत भाजपचे सध्या ६० नगरसेवक आहेत. यातील अवघे १० ते १२ नगरसेवकच मेळाव्याला उपस्थित होते. त्यामुळे भाजपमधील दुफळी अद्याप कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मेहता गटाने रवी व्यास यांना जिल्हाध्यक्ष मानण्यास नकार दिला आहे. त्यामुळे व्यास यांनी आयोजित केलेल्या कोणत्याही कार्यक्रमाला मेहता गट उपस्थित राहत नाही. प्रवीण दरेकर यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून त्यांनी मेहता यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र या चर्चेतून काहीच निष्पन्न झाले नाही.

प्रदेशाध्यक्षांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या मेळाव्याला नरेंद्र मेहता यांच्यासह त्यांच्या गटाचे नगरसेवक अनुपस्थित राहिले होते. त्याची दखल घेत पाटील यांनी पक्षापुढे कोणतीही व्यक्ती श्रेष्ठ नाही, असा इशारा मेहता यांचे नाव न घेता दिला होता. मात्र खुद्द प्रदेशाध्यक्षांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत मेहता गटाने व्यास यांना सहकार्य न करण्याचे धोरण सुरूच ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते आशीष शेलार देखील कार्यक्रमानिमित्त भाईंदरमध्ये आले होते. त्यावेळीदेखील गटबाजी उफाळून आली होती. त्यामुळे नेत्यांच्या भांडणात कार्यकर्ते मात्र नेमके कोणत्या गटाकडे जायचे, या संभ्रमात आहेत.

हस्तक्षेपासाठी फडणवीसच!
१) मध्यंतरी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच स्वत: लक्ष घालून गटबाजीवर तोडगा काढण्यासाठी बैठक आयोजित करण्याचे नक्की केले होते; मात्र फडणवीस यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ही बैठक अद्याप झालेली नाही. दरम्यानच्या काळात मिरा-भाईंदरची जबाबदारी प्रवीण दरेकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
२) दरेकर या दुफळीवर यशस्वी तोडगा काढतील, अशी शक्यता कार्यकर्त्यांना वाटत आहे. त्यानुसार याप्रकरणी संबंधितांशी दोन वेळा चर्चा केल्याचे खुद्द दरेकर यांनीच सांगितले आहे; परंतु त्यांनाही वाद मिटवण्यात अद्याप यश आलेले नाही. गटबाजी संपुष्टात आणू, असे दरेकर सांगत असले तरी फडणवीस यांनाच हस्तक्षेप करावा लागेल, असेच चित्र आहे.

तोडगा काढावाच लागेल...
ऑगस्ट महिन्यात मिरा-भाईंदर महापालिकेची मुदत संपुष्टात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार ऑगस्टनंतर निवडणूक कधीही घोषित होऊ शकते. भाजपला महापालिकेतील सत्ता टिकवायची असेल तर गटबाजीवर तोडगा काढावाच लागेल, अन्यथा भाजपला त्याचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील, असे खुद्द भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81903 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top