
मुलांच्या लसीकरणात मुंबई ढेपाळलेलीच!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : कोविड लसीकरण मोहिमेचा विस्तार केल्यानंतर १२ ते १५ वयोगटातील मुलांचाही यात समावेश केला आहे. जवळपास दोन महिन्यांनंतर मुंबईतील पात्र लोकसंख्येपैकी केवळ एक तृतीयांश मुलांनीच लशीचा पहिला डोस घेतल्याचे समोर आले आहे. एकूण ३.९ लाख मुलांपैकी एक लाख ५२४ मुलांचा पहिला डोस झाल्याने १२ ते १५ वयोगटातील मुलांच्या लसीकरणात मुंबई ढेपाळलेल्या अवस्थेत आहे. मुंबईत २४ हजार ३८० (६.२५ टक्के) मुलांनी आतापर्यंत लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत.
लहान मुलांच्या लसीकरणात मुंबई सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक आहे. एकंदरीत राज्याच्या १२-१५ वयोगटातील लोकसंख्येपैकी मुंबईत ५५ टक्के मुलांनी पहिला डोस घेतला आहे; तर राज्यात ३९ लाख पात्र लोकसंख्येपैकी ८,२०,९२९ (२१ टक्के) मुलांनी दोन्ही डोस घेतले आहेत; तर २१ लाख ८१ हजार १८ (५५.९२टक्के) मुलांनी पहिला डोस घेतला आहे. दरम्यान, मुंबईत १८ ते ६० वयोगटातील बूस्टर डोसचे प्रमाणही कमी आहे. कोविडच्या रुग्णांमध्ये किंचित वाढ होत असताना लसीकरणाचे प्रमाण मात्र कमी आहे. ४५ ते ६० वयोगटातीच रुग्णांमध्ये थोडीशी वाढ नोंदवली आहे. मुंबईत आतापर्यंत ६६, ७५९ नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे.
---------
शाळा-महाविद्यालयांमध्ये लसीकरण?
मुलांचे लसीकरण होणे महत्त्वाचे आहे. त्यांना लवकरात लवकर डोस मिळावेत, यासाठी मार्ग काढावा लागेल. बैठकीत यावर चर्चा झाली आहे आणि आम्ही लसीकरण केंद्रांऐवजी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्याचे सुचवले आहे, असे टास्क फोर्सच्या एका सदस्याने सांगितले.
सुट्यांमुळे प्रतिसादच नाही
मुंबई महापालिकेने काही सामाजिक संस्थांच्या मदतीने शाळांसोबत शिबिरे आयोजित केली आहेत. पण सुट्यांमुळे प्रतिसाद कमी मिळत आहे. कोविड रुग्णांच्या संख्येत किरकोळ वाढ झाल्यामुळे जागरुकता अजूनही असली तरी, लसीकरणाला नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद कमी आहे. पण हा हलगर्जीपणा दूर करणे गरजेचे आहे.
कोविड रुग्णांमध्ये घट होत आहे आणि बहुतेक मुलांनाही लक्षणे नाहीत. त्यामुळे पालक लसीकरणासाठी संकोच करतात. अनेक पालकांना त्यांच्या मुलांवर लसीचे दुष्परिणाम होऊ नयेत, असेही वाटते.
- डॉ. बकुल पारेख, बालरोगतज्ज्ञ, टास्क फोर्सचे सदस्य.
मुलांमधील लसीकरणाच्या संख्येत सुधारणा होण्यासाठी आणखी एक किंवा दोन महिने लागतील. आता शाळांना सुट्या आहेत. बहुतेक नागरिक गावी गेले आहेत. पुढील एका महिन्यात ही संख्या सुधारेल, अशी अपेक्षा अजूनही नाही.
- डॉ. सचिन देसाई,
राज्य लसीकरण अधिकारी.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81909 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..