
उष्णतेच्या कालावधीत मांसाहार टाळावा
तुर्भे, ता. ११ (बातमीदार) : सध्या उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे तापमान वाढविणारे पदार्थ खाल्ल्यास शरीराचे तापमान वाढते. त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. म्हणून शरीराचे तापमान वाढवणारे पदार्थ टाळावेत, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
चिकन, अंडी, मासे आणि इतरही मांसाहारी पदार्थांमध्ये जास्त कॅलरीज असतात. ते चयापचय प्रक्रिया वाढवत असतात. हे जरी सत्य असले तरी उन्हाळ्याच्या उष्णतेमध्ये हे पदार्थ शरीराला नुकसानकारक ठरण्याची शक्यता जास्त असते. हे नागरिकांनी समजून घेण्याची गरज असल्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला. मांसाहारी खाद्यपदार्थ हे हिवाळ्यात चांगलेच फायदेशीर असले, तरी उन्हाळ्यात मानवासाठी प्रतिकूल असतात. सध्या पर्यावरणीय तापमान ४० ते ४५ अंश आहे. यामुळे शरीरातील चयापचय वाढल्याने उन्हाळ्यात आरोग्याशी संबंधित धोके वाढतील, असेही मत वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
चिकनकडे खवय्यांची पाठ
हिवाळ्यात चिकनला खवय्यांचा चांगलाच प्रतिसाद असतो, पण नागरिकांनीही उष्णतेत जास्त चिकन खाऊ नये. त्याने शारीरिक आरोग्याच्या समस्या वाढतील, म्हणून ग्राहकांनीही चिकनकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र नवी मुंबईमध्ये आहे. तसेच शरीराला पचेल असे हलके अन्न, तसेच जास्तीत जास्त शीतपेय पिण्याकडे नागरिकांचा कळ वाढला आहे. सध्या शारीरिक थंडावा देणाऱ्या खाद्यपदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.
आरोग्याच्या समस्या वाढीस लागतील, म्हणून नागरिकांनी उष्णतेच्या कालावधीत मांसाहार टाळावा. शक्य तितक्या पालेभाज्या, इतर भाज्या, फळांचा वापर करावा. यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवणार नाहीत. तसेच शरीर बळकट होईल.
- डॉ. राजश्री हनुमंतराव पाटील, माथाडी हॉस्पिटल.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81918 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..