रखडेलेल्या योजनेचा कराचा भार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रखडेलेल्या योजनेचा कराचा भार
रखडेलेल्या योजनेचा कराचा भार

रखडेलेल्या योजनेचा कराचा भार

sakal_logo
By

भाईंदर, ता. ११ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरात सुरू असलेल्या भूमिगत गटार योजनेच्या बदल्यात नागरिकांवर मलप्रवाह सुविधा लाभ आकारण्यात आला आहे. गेली अनेक वर्षे ही योजना रखडलेली असतानाही नागरिक निमूटपणे या कराचा भरणा करत आहे; परंतु शहराच्या ज्या भागात ही सुविधा भविष्यात दिलीच जाणार नाही त्या भागातील रहिवासीदेखील हा कर भरत असून या कराविरोधात त्यांच्यात प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. चार वर्षांपूर्वी पार पडलेल्या महासभेत ज्या भागात ही सुविधा दिली जाणार नाही, त्या भागातील लोकांकडून कर वसूल करू नये, असा ठराव महासभेने मंजूर केला आहे. मात्र त्यानंतरही प्रशासनाकडून कराची वसुली सुरूच आहे. ही वसुली तातडीने थांबवून ठरावाची अंमलबजावणी करावी, असे आदेश महापौरांनी दिले आहेत.
२००९ पासून भूमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे; परंतु अजूनही ते पूर्ण झाले नाही. या योजनेचा लाभ देण्याच्या बदल्यात नागरिकांकडून मालमत्ता कराच्या आठ टक्के इतका मलप्रवाह सुविधा लाभ कर वसूल करण्यात येत आहे. या करापोटी महापालिकेने कोट्यवधी रुपये वसूल केले आहेत. एकीकडे वर्षानुवर्षे कराचा भरणा केल्यानंतरही अनेक ठिकाणी योजनेचा लाभ अद्याप मिळाला नसल्याने नागरिकांमध्ये आधीच नाराजीचे वातावरण आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात आणि दाटीवाटीच्या भागात ही योजना राबवली जाणार नसतानाही त्या ठिकाणाच्या नागरिकांनाही कर भरावा लगत असल्यामुळे त्या ठिकाणच्या रहिवाशांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. भाईंदर पश्चिम येथील राई, मुर्धा, मोर्वा, उत्तन, भाईंदर पूर्व भागातील नवघर, गोडदेव आणि खारीगाव आणि महामार्ग परिसरातील घोडबंदर पेणकर पाडा या भागात ही योजना राबवली जाणार नाही. जी योजना आमच्यासाठी नाहीच त्याचा कर आम्ही का भरायचा, असा प्रश्न येथील रहिवासी विचारत आहेत. या पार्श्वभूमीवर २०१८ मध्ये महासभेने यावर निर्णय घेतला होता. ज्या ठिकाणी भूमिगत गटार योजनेचे काम झालेले नाही त्या ठिकाणच्या रहिवाशांकडून हा कर वसूल करू नये, असा ठराव महासभेने मंजूर केला होता. मात्र त्यानंतरही हा कर वसूल केला जात आहे.
नुकत्याच पार पडलेल्या महासभेत मुर्धा, राई येथील नगरसेवक विनोद म्हात्रे आणि जयेश भोईर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी करासंदर्भात महासभेने याआधी मंजूर केलेल्या ठरावाचे पालन करण्यात यावे, असे आदेश प्रशासनाला दिले.

आंदोलनाचा इशारा
प्रशासनाने महासभेच्या ठरावाची अंमलबजावणी केली नाही तर ग्रामस्थांच्या मदतीने आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी दिला आहे. यासंदर्भात महापालिकेचे उपायुक्त संजय शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता हा कर संपूर्ण योजनेसाठी लावण्यात आला आहे. त्यामुळे ज्या भागात सुविधा नाही त्याठिकाणीही तो वसूल केला जात आहे, असा खुलासा शिंदे यांनी केला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81933 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top