
रानसईत महिनाभराचा पाणीसाठा
उरण, ता.१२ (वार्ताहर) ः उरण तालुक्यात औद्योगिकरणाबरोबर नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. तालुक्याची पाण्याची तहान भागविणारे रानसई धरण अपुरे पडू लागल्याने अनेक भागांत पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे. रानसई धरणात महिनाभर पुरेल एवढाच वापरण्यायोग्य साठा शिल्लक आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाईचे संकट बिकट होण्याची शक्यता वर्तविण्यात आहे. हे टाळण्यासाठी प्रशासनाने जलस्रोत वाढविण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
उरण तालुक्यात ओएनजीसी, जेएनपीटी, बीपीसीएल, जीटीपीएस प्रकल्प आदी केंद्र व राज्य सरकारचे महत्त्वाचे प्रकल्प आहेत. या प्रकल्ंपावर आधारित अन्य प्रकल्पांमध्येही हजारो लोक काम करीत असून द्रोणागिरीसारखा मोठा नोड विकसित होत आहे. येथील प्रकल्पांना, २१ ग्रामपंचायती आणि नगरपालिका क्षेत्रांतील रहिवाशांना रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे; तर उरणच्या पूर्व भागातील आठ गावांना पुनाडे धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच सिडकोच्या माध्यमातून हेटवणे धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या उरण तालुक्याची लोकसंख्या अडीच लाखांहून अधिक आहे.
उरण तालुक्याच्या जवळच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व शिवडी-न्हावा सेतू (सी-लिंक) तयार होत असल्याने परिसराचा विकास साधण्यासाठी सिडकोने पुढाकार घेतला आहे. भविष्याचा विचार करता, येत्या पाच, दहा वर्षांत तालुक्याची लोकसंख्या दुप्पट-तिपटीने वाढणार असून त्या तुलनेत पाण्याची गरजही वाढणार आहे. त्यामुळे पर्यायी जलस्रोत, पाणीसाठा वाढविण्यावर भर देणे गरजेचे आहे. रानसई धरणाची उंची वाढविली तर तीस टक्के पाणीसाठा वाढेल. मध्यंतरी धरणांच्या बंधाऱ्याची उंची वाढवावी, असा निर्णयही घेण्यात आला होता. मात्र त्याची अंमलबजावणी आजतागायत झालेली नाही. त्यामुळे प्रस्ताव लालफितीतच अडकला आहे.
पुनाडे धरणातून आठ गावांना पाणीपुरवठा होतो. मात्र गळती लागल्याने धरण एप्रिल महिन्यात तळ गाठते. त्यामुळे लगतच्या गावांना पाण्यासाठी दररोज संघर्ष करावा लागतो. पुनाडे धरणाची गळती थांबली तर संपूर्ण तालुक्याचा पाणीप्रश्न सुटेल, असा विश्वास शहरातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत असून पालकमंत्री अदिती तटकरे यांनी रानसई धरणाची उंची वाढवण्यासाठी व पुनाडे धरणाची गळती थांबविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.
रानसई धरणाची उंची वाढविण्यासाठी प्रस्ताव तयार झाला आहे; परंतु याबाबत वरिष्ठ पातळीवरून निर्णय अपेक्षित आहे. भविष्यात ३० टक्के तरी पाणीसाठा वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी धरणाची उंची वाढली पाहिजे. सद्यस्थितीत धरणात पाणीसाठा कमी असल्याने आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात करण्यात येत आहे. १२ जूनपर्यंत पुरेल एवढा साठा धरणात आहे.
- रवींद्र चौधरी, अधिकारी, एमआयडीसी.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81938 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..