
कोविड रुग्णालय रुग्णमुक्त
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : गेल्या वर्षी मे महिन्यातील खचाखच भरलेल्या ठाण्यातील कोविड रुग्णालयात आजच्या घडीला शून्य रुग्ण दाखल असल्याचा सुखद धक्का मिळाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पालिकेने ग्लोबल रुग्णालयाला आधीच टाळे ठोकले होते. त्यानंतर हायरिस्कच्या रुग्णांसाठी सुरू असलेले पार्कींग प्लाझा रुग्णालयही रुग्णमुक्त झाले आहे. कोरोनाच्या शिरकावानंतर पहिल्यांदाच कोविड रुग्णालयातील सर्व बेड रिकामे असून खऱ्या अर्थाने शुकशुकाट पसरला आहे.
मार्च २०२० मध्ये दाखल झालेल्या कोरोनाच्या वेढ्याला दोन वर्षांचा कालावधी लोटला आहे. या दोन-सव्वादोन वर्षांमध्ये आदळलेल्या तीन लाटांमध्ये ठाणे पालिका हद्दीतील सुमारे १ लाख ८३ हजार ८७४ जणांना कोरोनाने घेरले. त्यापैकी १ लाख ६३ हजार ६४८ जणांना त्यावर मात केली, तर २ हजार १३० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी ठाण्यात उभारण्यात आलेले हजार खाटांची क्षमता असलेले ग्लोबल कोविड सेंटर रुग्णांसाठी वरदान ठरले.
एकीकडे खासगी रुग्णालयात रुग्णांची लूट सुरू असताना पालिकेच्या रुग्णालयात मोफत उपचाराने हजारो रुग्ण बरे झाले. त्यानंतर रुग्णसंख्या वाढतच असल्याने पालिकेने ज्युपिटरजवळील पार्कींग प्लाझा येथे दुसरे कोविड सेंटर उभे केले. पालिकेच्या ग्लोबल रुग्णालयातील रुग्णसंख्या कमी होऊन दोन रुग्णालयांपैकी एकच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ग्लोबल रुग्णालयाला काही महिन्यांपूर्वीच टाळे लागले. गेल्या दोन महिन्यांपासून ठाण्यातील रुग्णसंख्या दोन ते दहाच्या दरम्यान स्थिरावली आहे; तर रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्याही नगण्य राहिली. त्यामुळे व्हेंटीलेटर अथवा ऑक्सिजनची गरज असलेलेच एक-दोन रुग्ण दाखल होत होते. मात्र १० मे रोजी पहिल्यांदाच रुग्णालयात शून्य रुग्ण दाखल झाले असून उपचाराधीन रुग्णांची नोंदही शून्य अशी झाली आहे.
कोरोनाचे पुन्हा डोके वर
रुग्णालये कोविडमुक्त झाली तरी कोरोनाने ठाण्यात पुन्हा डोके वर काढल्याचे दिसून आले आहे. तिसरी लाट गेल्यानंतर एप्रिल महिन्यात दोन ते दहा दैनंदिन रुग्णांवर स्थिरावलेली रुग्णसंख्या मंगळवारी थेट २० वर पोहचली; तर बुधवारीही ११ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्यामुळे ते घरीच उपचार घेत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81940 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..