ठाणे शहर यंदाही तुंबणार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे शहर यंदाही तुंबणार!
ठाणे शहर यंदाही तुंबणार!

ठाणे शहर यंदाही तुंबणार!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. ११ : ठाणे शहरात पालिकेतर्फे यंदा पावसाळापूर्व नालेसफाईला सुरुवात झाली आहे. मान्सूनमध्ये शहरात पाणी तुंबण्याच्या घटना घडू नये याकरिता नालेसफाईसह गटारांची सफाई करण्यात येते. यंदाही नालेसफाईला सुरुवात झाली आहे; परंतु नालेसफाई करूनही शहरातील उथळ भागात पाणी तुंबण्याच्या घटना घडत असतात. यंदाच्या पावसाळ्यातदेखील शहरातील पाणी तुंबणारी १४ ठिकाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून निश्‍चित करण्यात आली आहेत.
ठाणे शहरात अतिवृष्टीमुळे पाणी तुंबण्याचे प्रकार दरवर्षी घडत असतात. दरवर्षी पालिकेकडून अशी ठिकाणे निश्चित करण्यात येत असतात. मागील वर्षापेक्षा यंदाच्या वर्षी पाणी तुंबण्याच्या ठिकाणात काही अंशी घट झाल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत असला तरी पालिकेने केलेल्या सर्व्हेत १४ ठिकाणांमध्ये पाणी तुंबण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राम मारुती रोड, गोखले रोड, राम गणेश गडकरी रंगायतन, सॅटिस पुलाखालील मासुंदा तलाव, वंदना टॉकीज परिसर आदी ठिकाणी दरवर्षी पाणी तुंबणारे `हॉटस्पॉट` ठरतात. यंदाही या ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

प्रभाग समितीनिहाय आढावा
नौपाडा प्रभाग समिती ८, उथळसर २, माजिवडा-मानपाडा २, कळवा १, मुंब्रा १ आदींचा समावेश आहे यात.

पाणी तुंबण्याची ठिकाणे
देवनार सोसायटी, वंदना टॉकीज, गजानन महाराज चौक, गडकरी चौक, देवधर रुग्णालय, जिजामाता मार्केट, पम्पिंग स्टेशन, चव्हाण चाळ, वृंदावन आणि श्रीरंग सोसायटी, पंचामृत, आयसीआयसीआय बॅंक घोडबंदर रोड, विटावा सबवे आणि दिवा गाव.

शहरातील ५० टक्के नालेसफाई पूर्ण!
ठाणे, ता. ११ : पावसाळापूर्व नालेसफाईची ५० टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा ठाणे महापालिकेने केला आहे. पालिका आयुक्तांनी केलेल्या पहाणीत नालेसफाईची कामे समाधानकारक झाल्याचे दिसून आले असून, उर्वरित कामे वेळेत करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. तसेच पावसाळ्यात कुठेही पाणी तुंबणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सक्त सूचनाही आयुक्तांनी केल्या आहेत.
ठाणे शहरात दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात नालेसफाईची कामे हाती घेतली जातात; परंतु या वर्षी एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच नालेसफाईच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ, जेसीबी व पोकलेन मशिनचा वापर करून नाल्यातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. त्याची पाहणी आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी बुधवारी केली.
सकाळी साडेआठला कै. महादेव पाटील चौक, पाचपाखाडी येथून आयुक्तांनी नालेसफाई कामाची पाहणी करण्यास सुरुवात केली. ज्ञानसाधना कॉलेज, धर्मवीरनगर, सुपरमॅक्स कंपनी, ब्राडमा कंपनी तसेच वागळे बस डेपो येथील नालेसाफसफाई कामाची पाहणी त्यांनी केली. या सर्व नाल्यांची खोली वाढविणे, नाल्याच्या बाजूच्या पडलेल्या भिंती बांधणे, नाल्याचा प्रवाह मोकळा करणे, प्रवाहातील अडथळे दूर करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधितांना दिल्या.

माजी महापौर, माजी नगरसेवकांचा गोतावळा
आयुक्तांच्या पाहणी दौऱ्यात माजी महापौरांसह माजी नगरसेवकांचाच गोतावळा अधिक असल्याचे बुधवारी दिसून आले. माजी महापौर नरेश म्हस्के, माजी नगरसेवक विकास रेपाळे, दीपक वेतकर, एकनाथ भोईर, माजी नगरसेविका रुचिता मोरे, दीपा गावंड, मीनल संख्ये, सुवर्णा कांबळे, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य नम्रता भोसले आदी नालेसफाई पाहणी दौऱ्यावेळी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81950 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top