
मद्यपी टीबी रुग्णांना समुपदेशन
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : पालिकेच्या शिवडी टीबी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या आणि दारूच्या आहारी गेलेल्या टीबी रुग्णांचे समुपदेशन केले जाणार आहे. मुंबई महापालिका पालिका आणि अल्कोहोलिक अनोनिमस या संस्थेच्या मदतीनुसार हा उपक्रम राबवला जाणार आहे. मुंबईतील केईएम, नायर आणि सायन या प्रमुख रुग्णालयांसह इतर २५ ठिकाणी टीबी नसलेल्या रुग्णांसाठीही अशा प्रकारचा उपक्रम राबवला जात आहे.
पुढील आठवड्यापासून दारूच्या आहारी गेलेल्या टीबी रुग्णांसाठी शिवडी रुग्णालयात हा उपक्रम सुरू होणार आहे. यासाठी १० जणांची टीम तयार करण्यात आली असून त्यात रुग्णालयातील पाच मानसोपचारतज्ज्ञ, त्यासह संस्थेचे तीन अधिकारी आणि इतर कर्मचारी असतील. ही टीम तत्पूर्वी टीबी रुग्णांची सर्व माहिती घेईल, ती व्यक्ती किती वर्षांपासून दारूचे सेवन करत आहे, याची चौकशी करतील.
दारूच्या अतिसेवनाने यकृतावरही मोठा परिणाम होतो, त्यातच टीबी रुग्णांना दिल्या जाणाऱ्या औषधांमुळे यकृतावर दुष्परिणामांची शक्यता असते. दारूचे व्यसन सुटले, तरी ती व्यक्ती किमान टीबी आजारावरील औषधे घेऊन बरे होऊ शकतात. त्यामुळे समुपदेशनाचा हा उपक्रम नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास शिवडी टीबी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. नम्रता कौर यांनी व्यक्त केला.
---
उपचाराबाबत समुपदेशन!
अनेक रुग्ण टीबी असूनही दारूचे सेवन करतात. त्यात त्यांना दिलेल्या गोळ्यांचा डोसही अधिक असतो. अनेक जण अर्धवट उपचार घेतात, तर काही जण पूर्णपणे सोडून टाकतात. त्यात रोग प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांचा टीबी आणखी बळावतो. ही बाब लक्षात घेता औषधोपचार मध्येच न सोडण्यासाठी आणि दारू सोडण्याबाबत समुपदेशन केले जाणार आहे.
---
रुग्ण घरी गेल्यावरही सुविधा
समुपदेशनाची सुविधा २४ तास उपलब्ध केल्यामुळे टीबी रुग्ण घरी गेल्यानंतरही त्यांच्यावर ट्रॅक ठेवता येऊ शकतो. त्यामुळे रुग्णांना काही अडल्यास त्यांना तात्काळ मदत घेता येईल. हा उपक्रम प्राथमिक स्वरूपात टीबी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी सुरू केला जाणार असून ही सुविधा मोफत असणार आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्यास बाहेरील रुग्णांसाठीही समुपदेशन उपलब्ध केले जाईल, असेही डॉ. कौर यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81962 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..