३१ मेपूर्वी ८० टक्के नालेसफाई! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

३१ मेपूर्वी ८० टक्के नालेसफाई!
३१ मेपूर्वी ८० टक्के नालेसफाई!

३१ मेपूर्वी ८० टक्के नालेसफाई!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ११ : अनेक आरोप प्रत्यारोपांनंतर उशिराने का होईना मुंबईत नालेसफाईला सुरुवात झाली. पालिकेने आता ३१ मे पूर्वी ८० टक्के नालेसफाई करणार असल्याचा दावा केला आहे. गेल्या साडेचार महिन्यात पालिकेने केवळ ४४ टक्के नालेसफाई केली असून, पुढील केवळ ३ आठवड्यामध्ये उर्वरित ३५ टक्के नालेसफाई करावी लागणार आहे. त्यामुळे हे उद्दिष्ट पालिका गाठणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 
  मुंबईत यावर्षी १५ दिवस उशिराने पावसाळापूर्व नालेसफाईला सुरुवात झाली. पालिकेवर नियुक्त प्रशासनाने नालेसफाईला घाईघाईत निविदा प्रक्रिया राबवली. मुंबईतील मोठ्या नाल्यांसाठी एकूण ६ निविदा मंजूर करण्यात आल्या असून, त्यांचे मूल्य सुमारे ७१ कोटी रुपये आहे. लहान नाल्यांसाठी सुमारे ९१ कोटी रुपये एकत्रित किंमतीच्या १७ निविदांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये शहर भागासाठी २, पूर्व उपनगरांसाठी ६ तर पश्चिम उपनगरांमधील कामांसाठी ९ निविदा आहेत. म्हणजेच, मोठे व लहान नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी सुमारे १६२ कोटींची कामे हाती घेण्यात आली आहेत, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे. 
मुंबईत साधारणतः ३४० किलोमीटर लांबीच्या छोट्या-मोठ्या नाल्यांची सफाई केली जाणार आहे. यासाठी दोन पाळ्यांमध्ये काम करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. या नाल्यांमधून साधारणतः २ लाख ५२ हजार ६१० मेट्रिक टन गाळ काढणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. मात्र आतापर्यंत जर ४४ टक्के नालेसफाई झाली असेल तर उर्वरित ३५ टक्के नालेसफाई पावसाळ्याआधी पूर्ण होईल का, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.


असे ठरवतात उद्दिष्ट
नाल्यांमधून गाळ काढल्याने पावसाळी पाण्याचा जलदगतीने निचरा होण्यास मदत मिळते. पावसाळ्यापूर्वी स्वच्छता करताना नाल्यांमधून किती गाळ उपसणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करून दरवर्षी नाल्यांमधून गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित केले जाते. मुंबई महानगरातील पर्जन्यमान आणि पावसाची तीव्रता याबाबतचा अनुभव लक्षात घेऊन, हे उद्दिष्ट ठरविले जाते.

१९,१२९ वाहनांचा वापर
नालेसफाई अहवालानुसार आतापार्यंत ३,३०,०८५ मेट्रिक टन (४४.७० टक्के) गाळ काढण्यात आला आहे. यासाठी १९,१२९ वाहनांचा वापर करण्यात आला आहे. नालेसफाईची डेडलाईन संपण्यास केवळ ३ आठवड्यांचा कालावधी बाकी असून या काळात पालिका प्रशासनाला उर्वरित ३५ टक्के गाळ साफ करावा लागणार आहे.

गाळ काढण्याचे उद्दिष्ट (मेट्रिक टन)
शहर विभाग - ३० हजार १४२
पूर्व उपनगर - ७३ हजार ४४३
पश्चिम उपनगर - १ लाख ४८ हजार २५
एकूण - २ लाख ५१ हजार ६१०

गाळ सफाईचे उद्दिष्ट (मेट्रिक टन)
पावसाळा पूर्व - ५,६७,६१३,
पावसाळ्यात - ६९,५२३
पावसाळ्यानंतर - १,०१,३४४
एकूण - ७,३८,४८७

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81976 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top