
शिक्षणासोबत गुणवत्तेचा मेळ साधण्याची गरज
मुंबई, ता. ११ ः मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लागत असलेली रांग, हे गत १० वर्षांतील सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिपाक आहे. सुरक्षित व गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याला मिळाले पाहिजे आणि तो त्यांचा अधिकार आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि निश्चितपणे शाळेत येता यावे, यासाठी ‘सुरक्षित शाळा प्रवेश’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. हा उपक्रम शिक्षण विभाग आणि नगरविकास विभागाच्या माध्यमातून राज्यभरात पोहोचला पाहिजे, अशी अपेक्षा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.
ठाकरे म्हणाले की, प्रत्येक शाळेच्या ५०० मीटर आवारात विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे वावरता आले पाहिजे. त्यासाठी चांगले पदपथ, पथदिवे, रस्ते, बस थांबे, रस्ता ओलांडण्याची सुविधा असणे आवश्यक आहे. शाळेमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची दंत, मानसिक आणि मधुमेह या तीन आरोग्य पैलूंच्या दृष्टिकोनातून काळजी घेणे अत्यावश्यक आहे. कोविड कालावधीमध्ये राज्यभरात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेतून केलेल्या सर्वेक्षणातून सुमारे १६ टक्के नागरिकांना रक्तशर्करेसंबंधित आरोग्य समस्या असल्याची बाब समोर आली आहे. त्याचप्रमाणे दंतविकारामुळे बालकांमध्ये कुपोषणाची समस्या निर्माण होते. तसेच मानसिक अनारोग्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यावर परिणाम होतो. त्यामुळे या तिन्ही पैलूंबाबत विद्यार्थ्यांची महापालिकेच्या शाळेत काळजी घेतली जात आहे. त्यासाठीच सुरक्षित शाळा प्रवेश अभियान राबवित असल्याचे ठाकरे यांनी नमूद केले.
---
महापालिकेच्या ६५० शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम तयार करण्यात आहेत. ५४ हजार विद्यार्थ्यांना टॅब दिले आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बोर्डांच्या शाळा सुरू करण्यात येत आहेत. पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी वाघोबा क्लब, खगोल प्रयोगशाळा सुरू केल्या आहेत.
- आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81984 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..