पामबीच मार्गावर वेगवान वाहनांना चाप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पामबीच मार्गावर वेगवान वाहनांना चाप
पामबीच मार्गावर वेगवान वाहनांना चाप

पामबीच मार्गावर वेगवान वाहनांना चाप

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १२ : पामबीच मार्गावर वेगात वाहने चालवणे आता महागडे ठरणार आहे. नियमापेक्षा अधिक वेगाने धावणाऱ्या वाहनांना पकडण्यासाठी महापालिकेतर्फे लवकरच ॲटोमॅटिक हाय स्पीड डिटेक्शन कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. मागील काही दिवसांपासून पामबीच मार्गावर होणाऱ्या अपघातासंबंधी आढावा घेण्यासाठी आयुक्त अभिजित बांगर यांनी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत वाहतूक विभागाचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते.

वाहतूक पोलिस उपआयुक्त पुरुषोत्तम कराड आणि महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांच्यासमवेत चर्चेमध्ये मोराज सर्कल सानपाडा, अक्षर सिग्नल, टीएस चाणक्य व सारसोळे सिग्नल ही पामबीच मार्गावरील चार ठिकाणे सर्वाधिक अपघातप्रवण अर्थात ब्लॅकस्पॉट असल्याचे निदर्शनास आले. पामबीचवर झालेल्या अपघाताच्या विविध कारणांचा विचार करताना चालकाचे वेगावर नियंत्रण सुटणे, ही बाब प्रामुख्याने दिसून येत आहे. वाहतूक पोलिस विभागामार्फत स्पीड गनद्वारे वेग मर्यादा ओलांडणाऱ्या बेजबाबदार वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असते. तथापि वाहनांवर नजर ठेवत असताना स्पीड गनला वाहन संख्येची मर्यादा असल्याने पामबीच मार्गावरील प्रमुख ब्लॅकस्पॉटवर ॲटोमॅटिक हाय स्पीड डिटेक्शन असणारे अत्याधुनिक कॅमेरे बसविण्याचे निर्देश आयुक्तांनी अभियांत्रिकी विभागास दिले.

वाहनांच्या वेगमर्यादेवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. वेगाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची नोंद ॲटोमॅटिक पोलिस नियंत्रण कक्षामध्ये होऊन त्यांच्यावर ई चलनमार्फत दंडात्मक कारवाई होणार आहे. पामबीचवर ठिकठिकाणी बसविण्यात येत असलेल्या सीसी टीव्हीच्या माध्यमातून रेड लाईट व्हायलेशन, तसेच नंबर प्लेट डिटेक्शन होणार असून असे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवरही कारवाई केली जाणार आहे.

सूचनाफलक लावणार
पामबीचवरील वेगमर्यादा, ती मर्यादा ओलांडल्यास त्यावरील दंडात्मक कारवाई, तसेच अपघातप्रवण क्षेत्र अशी धोक्याची सूचना देणारे मराठी व इंग्रजी भाषेतील फलक सहज नजरेस पडतील, अशा प्रकारे ठळकपणे प्रदर्शित करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले. ठाणे-बेलापूर मार्गाचीही संयुक्त पाहणी करून तेथेही वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले.

पामबीच मार्गावर होणारे अपघात हे प्रामुख्याने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळेच घडत असल्याचे लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिका आवश्यक उपाययोजना वाहतूक पोलिस विभागाचे सहकार्य घेऊन करीत आहे.
अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81989 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top