
वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली १६ लाखांचा गंडा
ठाणे, ता. १२ ः रशियातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी प्रवेश मिळवून दिल्यानंतर त्याठिकाणी शैक्षणिक शुल्क भरून देण्याच्या नावाखाली ठाण्यातील एका संस्थेने अंबरनाथ, वांगणी येथील एका डॉक्टरच्या दोन मुलांना १६ लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी एक दुकलीला नौपाडा पोलिसांनी अटक केली.
सागर साळवी (३२) आणि विक्रांत साळवी (३०) असे अटक केलेल्या दुकलीची नावे आहेत. वांगणी येथील डॉ. उमाशंकर गुप्ता (५१) यांना १४ ऑगस्ट २०१८ रोजी ठाण्यातील एज्युकेशन ओव्हरशिस कन्सल्टन्सी येथून विक्रांत साळवी याने फोन केला होता. रशियातील ऑरेनबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएससाठी प्रवेश मिळवून देतो, अशी त्याने बतावणी केली. त्यानुसार ठाण्यातील गोखले रस्त्यावरील विक्रांत आणि सागर साळवी यांच्या कार्यालयात डॉ. गुप्ता यांनी संपर्क केला. त्यांची मुलगी आणि मुलासाठी सुरुवातीला प्रवेश प्रक्रियेच्या नावाखाली एक लाख ६० हजारांची रक्कम त्यांनी घेतली. तेव्हा २०१८ मध्ये रशियातील ऑरेनबर्ग स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्या मुलीचा त्याने वैद्यकीय प्रवेश मिळवून दिला. प्रवेशानंतर सागर स्वत: मुलीला रशियामध्ये घेऊन गेला. तिथे तिच्याकडून सहा हजार ४०० डॉलर अर्थात चार लाख ४८ हजारांची रक्कम घेत पहिल्या वर्षाच्या वास्तव्यासह खाण्याची आणि प्रवेशाचे शुल्क भरल्याचे सांगितले. त्यानंतर २०१९ मध्ये गुप्ता यांच्या मुलाच्या प्रवेशासाठीही रशियातील त्याच युनिव्हर्सिटीमध्ये सागरने प्रवेशाचा अर्ज भरला. त्याच्यासाठीही एक लाख ६० हजार रुपये त्याने घेतले. नंतर मुलीचे उर्वरित पाच वर्षांचे १३ लाख रुपये आणि मुलाचे सहा वर्षांचे १७ लाख अशी दोघांचीही एकत्रित ३० लाखांची रक्कम डॉ. गुप्ता यांच्याकडून साळवी याने घेतली. प्रत्यक्षात त्या ३० लाखांपैकी फक्त १४ लाख रुपये रुस एज्युकेशन मार्फत भरले. उर्वरित १६ लाख रुपये भरलेच नाहीत. दुसरीकडे शुल्क न भरल्यामुळे या दोन्ही मुलांचा प्रवेशही रद्द झाला. या प्रकरणी दिल्ली येथील रुस एज्युकेशन संस्थेतील साकीब आणि वसीम सय्यद अशा चौघांविरुद्ध डॉ. गुप्ता यांनी २९ एप्रिल २०२२ रोजी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर या दोघांना ९ मे रोजी अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82002 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..