मालमत्ताकर माफीत शिवसेना काठावर पास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालमत्ताकर माफीत शिवसेना काठावर पास
मालमत्ताकर माफीत शिवसेना काठावर पास

मालमत्ताकर माफीत शिवसेना काठावर पास

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ ः ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्याच्या ‘परीक्षेत’ ठाण्यात सत्ताधारी शिवसेना काठावरच पास झाली आहे. ठाणेकरांना सरसकट नव्हे तर केवळ ३५ टक्केच मालमत्ता करात सवलत मिळणार असून त्यावर खुद्द माजी महापौर नरेश म्हस्के यांनीच शिक्कामोर्तब केले आहे. इतकेच नव्हे तर महागाईच्या झळांचे दाखले देत मालमत्ता करात दिलेल्या ३५ टक्के करमाफीमुळे ठाणेकरांना दिलासाच मिळाला असल्याचा दावा करत स्वतःची पाठ थोपटण्याचाच प्रयत्न केला आहे.
गेल्या पालिका निवडणुकीत मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातील ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफी देण्याचे वचन शिवसेनेने ठाणेकरांना दिले होते. तसा ठराव सत्ताधारी शिवसेनेने पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला होता. त्यानंतर हा ठराव अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे धाडण्यात आला होता. हा ठराव मंजूर करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगरविकास मंत्री, तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर सर्व प्रशासकीय सोपस्कार पार पाडून नगरविकास मंत्रालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले.
एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीसाठी ठाणेकरांना मालमत्ता कराची बिले धाडताना त्यातला सर्वसामान्य कर माफ करण्यात आला आहे. मात्र एकूण मालमत्ता कराच्या बिलात ही माफ केलेली रक्कम जवळपास ३५ टक्केच असल्याचे समोर आले आहे. त्यावर विरोधकांसह ठाणेकरांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर माजी महापौर नरेश म्हस्के यांनी सारवासारव करण्यास सुरुवात केली आहे. ३५ टक्के करमाफी हेही नसे थोडके या थाटात त्यांनी सवलतीचे गणित मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

५० कोटी होणार माफ
हिरानंदानी इस्टेट येथील ५०० चौरस फुटांच्या काही मालमत्तांना १८ हजार रुपये मालमत्ता कर भरावा लागत होता. तो आता १२ हजारांवर आला आहे. या कुटुंबांसाठी सहा हजारांची सवलत मोठी असल्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे. तसेच काही चाळींमध्ये दीड हजारांचा मालमत्ता कर आता एक हजार रुपयांपेक्षाही कमी झाला आहे. पालिकेच्या तिजोरीतील मालमत्ता कराची आवक त्यामुळे ५० कोटींनी कमी होणार आहे. याचाच अर्थ सर्वसामान्य ठाणेकरांच्या खिशातून वसूल केले जाणारे ५० कोटी रुपये या सवलतीमुळे माफ झाले असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82003 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top