
टाटा हायड्रो पॉवरच्या पाण्याची चाचपणी करा नवी मुंबई साठी टाटा हायड्रो पॉवर च्या पाण्याची चाचपणी करा
नेरूळ, ता. १२ (बातमीदार) : नवी मुंबईतील पाण्याची मागणी वाढली आहे. परिणामी अनेक भागांत पाणीटंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भविष्यातील पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन खोपोली येथील टाटा हायड्रो पॉवरचे पाणी नवी मुंबईला मिळविण्याच्या दृष्टीने चाचपणी करा, अशी सूचना ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेला केली आहे.
आमदार नाईक यांनी बुधवारी (ता. ११) महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली. मोरबे धरणाच्या कॅचमेंट एरियाची क्षमता पूर्णपणे वापरली गेली आहे. त्यामुळे शहराची पाण्याची वाढती गरज लक्षात घेता टाटा हायड्रो पॉवरच्या पाण्याचा पर्याय उत्तम ठरेल, असे नाईक यांनी स्पष्ट केले. यासाठी मागील अनेक वर्षांपासून सरकारी पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. या संदर्भात महापालिकेने सकारात्मक पुढाकार घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली आहे.
नवी मुंबईच्या हक्काचे पाणी परस्पर अन्य शहरात वळविले जात आहे, तसेच एमआयडीसीकडून मंजूर कोट्यापेक्षा नवी मुंबईला कमी पाणीपुरवठा केला जात असल्याने शहरात विविध ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. एमआयडीसी, हेटवणे धरणातून ठरलेल्या कोट्याप्रमाणे पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82011 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..