
सातव्या वेतन आयोगाची प्रतीक्षाच
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग एप्रिल महिन्यापासून लागू करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते; मात्र हा वेतन आयोग लागू करण्यात आजही काही त्रुटी असल्याने त्या दूर करून जूनचे वेतन कामगारांना सातव्या वेतन आयोगानुसार दिले जाईल, असे आश्वासन दिले आहे. त्यातच काही कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पदे ही सरकारकडे आहेत. त्या पदांचे करायचे काय, असा प्रश्न प्रशासनाला सतावत आहे. त्याबाबतचे मार्गदर्शन पालिकेने सरकारकडून मागवले आहे.
ठाणे पालिका कर्मचाऱ्यांना एप्रिल २०२१ मध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता; परंतु एक वर्षानंतरही त्याची अंमलबजावणी झाली नाही. पालिकेच्या वर्ग एकमध्ये २०० ते ३०० संवर्ग आहेत. त्यामुळे याची समकक्ष तपासणी करणे शिल्लक होते. त्याचसोबत समकक्ष वेतन श्रेणी ठरवण्याचे काम देखील बाकी असून, ही संपूर्ण कामे करून अहवाल अंतिम टप्प्यात आला आहे. हे काम ९७ टक्के पूर्ण झाल्याचे प्रशासनाने महासभेत सांगितले होते; मात्र अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे कर्मचारी सातव्या वेतन आयोगानुसार मिळणाऱ्या वेतनाची प्रतीक्षा करत आहेत.
पदांबाबत संभ्रम
१) महापालिकेत सातवा वेतन आयोग लागू झाला असला तरीही अनेक कर्मचाऱ्यांची वेतन श्रेणी अधिक असल्याची माहितीही समोर आली आहे. अशा कर्मचाऱ्यांची यादी पालिकेने तयार केली आहे. त्यानुसार यामध्ये सुमारे ३४६ कर्मचाऱ्यांना अधिकची वेतन श्रेणी आहे. त्यातील सुमारे १०१ पदे आता समकक्षेत आणण्यात आली आहे; तर उर्वरित २४५ पदांमध्ये अद्यापही संभ्रम कायम असल्याचे दिसून आले आहे.
२) काही पदांमध्ये म्हणजेच कर्मचाऱ्यांना सरकारच्या निकषापेक्षाही अधिकचे वेतन आहे; तर काही पदे जी सरकार पातळीवर नाहीत, अशी पदे पालिकेने निर्माण केली आहेत. जी राज्यातील इतर कोणत्याही महापालिकेच्या ठिकाणी नसल्याचे दिसून आले आहे. यामध्ये अतिरिक्त नगर अभियंता, उप स्वच्छता निरीक्षक आदींचा त्यात समावेश आहे. त्यामुळे अशा पदांसाठी कोणते निकष लावायचे, असा पेचही प्रशासनासमोर आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82017 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..