
१४ गाव शिवसेनेतील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १२ : नवी मुंबई पालिकेत १४ गावांचा समावेश करण्याविषयीची घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात केली होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांच्या या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी त्यांचा सत्कार सोहळा १४ गाव सर्वपक्षीय विकास समितीच्या वतीने आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्याविषयीची आढावा बैठक बुधवारी (ता. ११) रात्री पार पडली; परंतु या बैठकीला उपस्थित राहिल्याबद्दल शिवसेना पदाधिकाऱ्याने शिवसेनेचे पंचायत समिती उपसभापतींना शिवीगाळ केली. या प्रकरणी शीळ-डायघर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. यानिमित्ताने १४ गावांतील शिवसेनेमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या १४ गावांचा पुन्हा या पालिकेत समावेश करावा, याविषयी १४ गाव सर्वपक्षीय विकास समितीच्या वतीने गेले कित्येक वर्षे लढा सुरू होता. नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या अधिवेशनात ही १४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याची घोषणा केली. यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पालकमंत्र्यांच्या या निर्णयाबद्दल त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन सर्वपक्षीय विकास समितीच्या वतीने केले जाणार आहे. याच कार्यक्रमाची आढावा बैठक बुधवारी रात्री नारिवली येथे आयोजित केली होती.
बैठकीला सर्व विकास समिती अध्यक्ष लक्ष्मण पाटील, कल्याण पंचायत समिती उपसभापती भरत काळू भोईर, सावळाराम पाटील यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपसभापती भोईर यांना शिवसेना दहिसर गावातील उप जिल्हाप्रमुख भरत भोईर यांनी संपर्क करून बैठकीला गेल्याबद्दल जाब विचारला. तसेच त्यांना शिवीगाळही केली. तसेच लक्ष्मण पाटील व सावळाराम पाटील यांनाही शिवीगाळ करीत दमदाटी केली. यामुळे संतप्त समिती पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाणे गाठत भरत कृष्णा भोईर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी पोलिसांना केली; परंतु पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे.
पदाधिकाऱ्यांचाच खोडा
विशेष म्हणजे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी करणे अपेक्षित होते; मात्र याला शिवसेनेतीलच काही पदाधिकारी खोडा घालीत असल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांकडून बोलले जाते. त्यात १४ गाव सर्वपक्षीय विकास समितीच्या वतीने हा सत्कार होत असल्याने त्याला शिवसेनेतील एका गटाकडून विरोध होत आहे.
शिवसेनेत २५ वर्षे आम्ही कार्यरत आहोत. दहिसरचे उप जिल्हाप्रमुख यांची दादागिरी आम्ही का सहन करायची. वरिष्ठांकडे या विषयी तक्रार केली आहे.
- भरत काळू भोईर, उपसभापती, कल्याण पंचायत समिती.
नारिवली येथे समितीचे कार्यकर्ते व नागरिक नियोजन बैठकीसाठी आले होते. शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख यांनी भरत भोईर यांना संपर्क करून धमकी दिली. त्यानंतर मला व नारिवलीचे माजी उपसरपंच पाटील यांनाही शिवीगाळ केली.
- लक्ष्मण पाटील, १४ गाव सर्वपक्षीय विकास समिती.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82034 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..