
वाड्यातील सिमेंटच्या रस्त्याला तडे
वाडा, ता. १२ (बातमीदार) ः वाडा शहरात विविध योजनांमधून सिमेंट क्राँकिटीकरणाच्या रस्त्याची कामे सुरू आहेत. मात्र यातील अनेक रस्त्यांना तडे गेले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या रस्त्यावर पाणी मारत नसल्याने रस्त्याला तडे जात आहेत. त्यामुळे या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
वाडा शहरात ४७ रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. यासाठी १० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहेत. मात्र काही ठिकाणी रस्ता उखडला गेला आहे. पिक कॉलनी, नेहरू नगर रोड येथे रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र रस्त्याला काही दिवसांतच तडे गेले असल्याचे दिसून येते आहे. येथील ग्रामस्थ समीर भानुशाली यांना रस्त्याबाबत विचारले असता रस्ता झाल्यापासून फक्त एकच दिवस पाणी मारले असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरपंचायतीचे नगर अभियंता सुदर्शन माकोडे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, निकृष्ट कामाविरोधात आवाज उठवण्यासाठी वाडा शहर रस्ते स॔घर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे.
प्रतिक्रिया
वाडा शहरात अनेक रस्त्यांची कामे सुरू असून ही कामे अंदाजपत्रकाप्रमाणे केली जात नसल्याने ती निकृष्ट दर्जाची होत आहेत. काही काही कामे तर रात्रीच्या वेळी चारचाकी गाड्यांच्या उजेडात केली जात आहेत. त्यामुळे कामे किती दर्जेदार होत असतील याचा अंदाज बांधता येईल. या कामाची चौकशी करण्यात यावी.
- अनंता वनगा, जिल्हा सरचिटणीस, काँग्रेस.
शहरातील अनेक नागरिकांनी निकृष्ठ कामाबाबत तक्रारी माझ्या कडे केल्या आहेत. त्याअनुषंगाने संबंधित ठेकेदारांना सुचना देण्यात आल्या आहेत. तशा प्रकारचे पत्रही मी काढणार आहे.
उध्दव कदम, मुख्याधिकारी, नगरपंचायत वाडा तथा तहसीलदार
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82041 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..