`एमएमआर`मध्ये फ्लेमिंगोंचा वरचष्मा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

`एमएमआर`मध्ये फ्लेमिंगोंचा वरचष्मा
`एमएमआर`मध्ये फ्लेमिंगोंचा वरचष्मा

`एमएमआर`मध्ये फ्लेमिंगोंचा वरचष्मा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १२ : मुंबई महानगर क्षेत्रात (एमएमआर) हजारो मैल प्रवास करून येणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांची यंदा विक्रमी संख्या नोंदवण्यात आली आहे. फ्लेमिंगो पक्ष्यांची गणना करण्याला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंतचा एमएमआर क्षेत्रात दाखल झालेल्या फ्लेमिंगो पक्ष्यांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. डिसेंबर २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत ठाणे क्रीक फ्लेमिंगो सॅंच्युरी (टीसीएफएस) येथे ५४ हजार फ्लेमिंगोंची संख्या नोंदवण्यात आली; तर शिवडी येथे १७ हजार आणि न्हावा येथे २७७ फ्लेमिंगोंची संख्या नोंदवण्यात आली आहे. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीने केलेल्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी समोर आली आहे.
यंदाच्या वर्षी फ्लेमिंगोंच्या संख्येत गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत चांगली वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांत फ्लेमिंगोंच्या संख्येत दोन टक्क्यांची घट झाली होती. यंदा एप्रिल महिन्यात एमएमआर क्षेत्रात एकूण एक लाख ३३ हजार फ्लेमिंगोंची संख्या नोंदवण्यात आली. शिवडी, न्हावा या ठिकाणी झालेल्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी समोर आली. फेब्रुवारी २०२०-२१ मध्ये हाच आकडा एक लाख ३ हजार तर फेब्रुवारी २०१९-२० मध्ये ९६ हजार ४०० आणि मार्च एक लाख २० हजार इतकी होती.
देशभरात बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीमार्फत फ्लेमिंगोंचे सर्वेक्षण २०१७ पासून सुरू झाले. हे सर्वेक्षण एक दशक म्हणजे २०२७ पर्यंत चालणार आहे. मुंबईत २०१८ मध्ये पहिल्यांदा फ्लेमिंगोंच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली. पण त्यानंतर दोन वर्षे २०२० आणि २०२१ मध्ये या सर्वेक्षणावर मर्यादा आल्या. यंदा फ्लेमिंगोच्या विक्रमी आकडेवारीची नोंद पाहता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही या गोष्टीची दखल घेतली आहे. त्यांनीही सर्वेक्षणाला सुरुवात झाल्यापासूनची सर्वाधिक आकडेवारी असल्याचे ट्विट केले आहे.

एमएमआरमध्ये पोषक वातावरण
फ्लेमिंगो पक्ष्यांना ताजे पाणी आणि अधिवासासाठीचे पोषक वातावरण हे मुंबई महानगर परिसरातील खाडी आणि ओलसर जमिनीच्या ठिकाणी मिळते. त्यामुळे मुंबईत या दिवसांमध्ये असणारे वातावरण पाहूनच मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगोंचे आगमन होते. या वातावरणात खाद्यही पुरेसे मिळत असल्याने फ्लेमिंगो मोठ्या संख्येने दाखल होतात, असे बीएचएनएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. काही वनस्पती तसेच जलचर प्राणी खाण्यासाठी मिळत असल्यानेच या ठिकाणी फ्लेमिंगोंच्या संख्येत गेल्या काही वर्षांत वाढ झाल्याचे ते म्हणाले.

फ्लेमिंगो : डिसेंबर २०२१ ते मार्च २०२२
ठाणे क्रीक- ५४ हजार
शिवडी- १७ हजार
न्हावा- २७७ हजार

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82056 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top