
कर्करोगाच्या रुग्णांची वाढती गर्दी
मुंबई, ता. १२ : कोविड नियंत्रणात आल्याने राज्य सरकारने निर्बंध शिथिल केल्याने आता इतर रुग्णालयांमध्येही रुग्णांची गर्दी वाढत आहे. कोविडच्या भीतीमुळे घराबाहेर न पडलेल्या रुग्णांची आता टाटा रुग्णालयातही संख्या वाढली आहे. २०२० च्या तुलनेत बाल कर्करोगाच्या रुग्णांमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वाढीसोबतच आर्थिक परिस्थितीमुळे अर्ध्यातच उपचार सोडणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी झाली आहे.
मुंबईत कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर रुग्णालयांमध्ये नॉन-कोविड रुग्णांचे प्रमाण थांबले होते. सरकारी रुग्णालयांमध्ये तपासणीपूर्वी कोविड चाचणी करावी लागण्याच्या भीतीने अनेक रुग्ण रुग्णालयांच्या पायऱ्याही चढत नव्हते; मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आल्याने रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढू लागली. टाटा रुग्णालयात २०२० मध्ये ११८९ नव्या कर्करोगाच्या बालरुग्णांची नोंद झाली होती, ती आता २०२१ मध्ये ११७६ झाली आहे. टाटा रुग्णालयात उपचारासाठी मुंबईतूनच नव्हे, तर परराज्यांतूनही रुग्ण येतात. कोविडमुळे परराज्यातील रुग्णांना मुंबईत येणे शक्य झाले नाही. आता निर्बंध शिथिल झाल्याने नवे रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी येऊ लागले आहेत. त्यामुळे कॅन्सरग्रस्त मुलांची संख्या वाढलेली दिसत असल्याचे टाटा रुग्णालयातील बाल कर्करोगतज्ज्ञ आणि शैक्षणिक संचालक डॉ. श्रीपाद बनावली यांनी सांगितले.
---
रक्ताच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक
नव्याने आलेल्या कर्करोगाच्या बालरुग्णांमध्ये रक्ताच्या कर्करोगाच्या रुग्णांचे (ल्युकेमिया आणि लिम्फोमा) प्रमाण अधिक आढळून येत आहेत. याशिवाय न्यूरो, किडनी, यकृत, हाडे व इतर अवयवांचे कर्करोगाचे रुग्णांचे प्रमाण लक्षणीय आहे.
----
विविध फाऊंडेशनची मदत -
आर्थिक व इतर कारणांमुळे कर्करोगाने ग्रस्त बालकांना मदत करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने २०१० मध्ये इम्पॅक्ट फाऊंडेशन सुरू केले होते. या फाऊंडेशनचे कर्मचारी कर्करोगग्रस्तांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांशी समन्वय साधून मुलांना आर्थिक मदत करतात. फाऊंडेशनच्या मदतीने दरवर्षी ३० ते ३५ कोटी रुपये दिले जातात, अशी माहिती डॉ. बनावली यांनी दिली.
----
वर्ष नवे बालरुग्ण उपचार सोडलेले
२०१६- १७९५ २१
२०१७- १९७२ ११
२०१८- २०३५ २६
२०१९- २०८१ १३
२०२०- ११८९ ३०
२०२१- १७७६ २१
२०२२(एप्रिल पर्यंत)- ६५८- ०१
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82070 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..