कर्जतच्या वसुंधरा पुरस्कारावर साशंकता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्जतच्या वसुंधरा पुरस्कारावर साशंकता
कर्जतच्या वसुंधरा पुरस्कारावर साशंकता

कर्जतच्या वसुंधरा पुरस्कारावर साशंकता

sakal_logo
By

कर्जत, ता. १२ (बातमीदार) : कर्जत शहर परिसरात मागील काळात एमएमआरडीएच्या माध्यमातून लाखोंचा निधी खर्च करून सर्व प्रभागांत सार्वजनिक शौचालये उभारण्यात आली. मात्र, नगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने साफसफाई आणि योग्य देखभाल न ठेवल्याने यातील काही शौचालयांची अत्यंत दुरवस्था झाल्याने नागरिकांनाही त्याचा वापर करणे कठीण झाले आहे. असे विदारक चित्र असताना नगरपालिकेला स्वच्छ सुंदर शहर म्हणून वसुंधरा पुरस्कार मिळाला. नगरपालिका या पुरस्कारासाठी खरेच मानकरी आहे का? असा उद्विग्न सवाल माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांनी उपस्थित केला आहे.
एकीकडे सरकार गावे, शहरे हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहे. प्रत्येक घरी शौचालय असावे, यासाठी आर्थिक अनुदान देत आहेत. जे उघड्यावर शौच करतील, त्यांच्यावर कारवाई करत आहेत. ग्रामपंचात आणि नगरपालिका हागणदारीमुक्त करण्यात यशस्वी झाली असून सरकारतर्फे त्यांना रोखरक्कम देवून सन्मानित करण्यात येत आहे. असे असताना कर्जत नगरपालिकेचा स्वच्छता विभाग मात्र याबाबत कमालीचा उदासीन असल्याची टीका नागरिकांतून होत आहे.
शहरातील काही सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाली आहे. शौचालयात पाण्याचा अभाव आहे. पूर्वी दिलेली नळजोडणीची तुटलेल्या अवस्थेत आहेत. काही ठिकाणी तर पाणीच येत नाही. साठवण टाक्यांना गळती लागली आहे. दरवाजे तुटलेले आहेत. अशा अवस्थेत या शौचालयांना कोण कसा वापर करणार? हाही एक मोठा प्रश्चच आहे. यात महिलांची अधिक कुचंबणा होत आहे. शौचालयात दिव्यांची तोडफोड केलेली असून वीजपुरवठाही खंडित असतो. अशा काळोखात महिलांना असुरक्षित वाटते. या सर्व बाबींकडे नगरपालिकेच्या संबंधित विभागाला कळवूनही त्‍याकडे कानाडोळा केला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कर्जत नगरपालिकेने शहरातील सर्व शौचालयांची त्वरित देखभाल दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
--------------------------------------------

आरोग्य सभापतींचे दुर्लक्ष
शहराची स्वच्छता ठेवून नागरिकांचे आरोग्य चांगले ठेवणे हे स्वच्छता व आरोग्य विभागाच्या सभापतींची जबाबदारी आहे. मात्र, ते याबाबत फारसा पुढाकार घेताना दिसून येत नाही. मागील दोन वर्षांत या विषयावर किती बैठका घेतल्या. कोणते जनहितार्थ निर्णय घेतले, याबाबत नागरिकांमध्येच शंका-कुशंका आहे.
------------------------------------------------------------------------------

स्वच्छता व आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे शहरातील सार्वजनिक शौचालयांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. एकीकडे स्वच्छ सुंदर शहराच्या वल्गना करायच्या आणि दुसरीकडे अशी दारुण परिस्थिती हा विरोधाभास आहे.
- राजेश लाड , माजी नगराध्यक्ष, कर्जत नगरपालिका
------------------------------------------------------------------------

ज्या सार्वजनिक शौचालयांचे दरवाजे तुटलेले आहेत, ते बसविण्यास सांगितले आहे. तसेच त्यांची देखभाल दुरुस्ती यापुढे ठेवण्यात येईल.
- सुदाम म्हसे, स्वच्छता व आरोग्य विभाग, कर्जत नगरपालिका
---------------------------------------------------
कर्जत शहरात सुमारे २० पेक्षा अधिक सार्वजनिक शौचालये आहेत. याबाबत मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष घालून पाहणी दौरा करावा. या शौचालयांमधील त्रुटी दूर करत योग्य त्या सुधारणा कराव्यात. नागरिकांचे आरोग्य कसे उत्तम राहील, याची खबरदारी घ्यावी.
- कृष्णा जाधव , सामाजिक कार्यकर्ते
--------------------------------------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82097 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top