
शेतकऱ्यांना महागाईच्या झळा
प्रसाद जोशी ः सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. १२ (बातमीदार) ः पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व्यावसायिक शेतीकडे वाटचाल सुरू असतानाच महागाईने उच्चांक गाठला आहे. या महागाईच्या झळा शेतकऱ्यांना बसत असून शेतमजुरीसह टँकर, बियाणे, खतापासून अन्य साहित्याचा खर्च वाढला आहे. त्यामुळे आधुनिक शेतीतून प्रगतीचा मार्ग शोधणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आर्थिक समीकरणे जुळवायची कशी, असा प्रश्न येऊन ठेपला आहे.
पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भात व बागायतीखाली जमीन आहे. ढोबळी मिरची, गवार, कांदा, फ्लॉवर यासह विविध प्रकारचा भाजीपाला, तसेच चिकू, आंबा, कलिंगड यासह अन्य फळांची, तसेच मोगरा, जुई, जास्वंद, चाफा व अन्य फुलांची लागवड करून शेतकरी उत्पादन घेत असतो. हा शेतमाल मुंबई, ठाणे व आजूबाजूच्या परिसरात विक्री केला जातो. मात्र हवामानात होणारे बदल, रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी अधीच चिंतेत असताना शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमतीत २० टक्के वाढ झाल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
पूर्वी शेतजमीन नांगरण्यासाठी ट्रॅक्टरच्या एका फेरीसाठी ५०० ते ६०० रुपये मोजावे लागत होते. मात्र, इंधन महागल्याने आता टॅक्ट्ररच्या एका फेरीसाठी ९०० रुपये मोजावे लागत आहेत. शिवाय पिकांवर मारण्यात येणाऱ्या कीटनाशक, सिंचन साहित्य, बियाणे या साऱ्याच्या किमती वाढल्या आहेत.
बियाण्यांच्या किमती वाढल्या
मे महिन्याच्या अखेरीस भात बियाणे जमिनीत पेरले जाते. शेतकऱ्यांची खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. मात्र, वाढत्या बियाण्याच्या किमतीने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ साधताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
केवळ इंधनाचे दर नाही तर शेतकऱ्यांना लागणारी अवजारे, इतर साहित्य यात वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पन्न कमी व खर्च जास्त अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदाच्या भातशेतीवर परिणाम होणार आहे.
- मनोहर पाटील, शेतकरी
शेती, बागायतीसाठी वापरात येणाऱ्या साहित्यावर केंद्र, राज्य सरकारकडून विविध कर आकारले जातात, ते कमी करावेत. धान्याला हवा त्या प्रमाणात भाव मिळत नाही. पीक विमा योजनेत सुधारणा करावी, तरच पुढील पिढी शेतीकडे वळेल.
- नरेश पाटील, कृषी अभ्यासक
महागाईने शेतकऱ्यांचे नियोजन बिघडले आहे. कीटकनाशकांचा खर्च अधिक व उत्पन्न कमी अशी परिस्थिती सध्या आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
- किरण पाटील, अध्यक्ष, अर्नाळा विविध कार्यकारी सोसायटी.
पूर्वीचे दर सध्याचे दर
कीटकनाशके
ऑरगॅनिक बायोजन एक गोण (८ किलो ) ६०० ८००
केकोमिल खत (४० किलो ) ७०० ८००
स्प्रे पंप बॅटरी ८०० ९०० ते एक हजार
कीटकनाशक लिक्विड लिटर ८०० १४००
शेतमजुरी २५० ४००
टॅक्टर एक फेरी ६०० ९००
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82098 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..