अभियानापुरतीच स्वच्छता मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभियानापुरतीच स्वच्छता मोहीम
अभियानापुरतीच स्वच्छता मोहीम

अभियानापुरतीच स्वच्छता मोहीम

sakal_logo
By

वाशी, ता. १२ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेला स्वच्छ भारत अभियानामध्ये सलग पाच वर्षे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. स्वच्छ भारत अभियान राबविण्यासाठी प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत; परंतु प्रत्यक्षात स्वच्छता मोहिमांवरील खर्च हा नंतर व्यर्थ जात असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. स्वच्छ भारत अभियानाची दिल्लीची टीम पाहणी दौरा करून गेल्यानंतर शहरात ‘जैसे थे’ परिस्थिती होण्यास सुरुवात झाली आहे.

शहरातील कचराकुंड्या कमी करण्यात आल्या आहेत, त्या ठिकाणी आता पुन्हा कचरा टाकण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पालिकेने रस्त्यावर लावलेल्या लिटल बिन्स या कचराकुंड्या झाल्या आहेत. कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने कचऱ्याचे ढीगदेखील निदर्शनास येत आहे. पालिकेने स्वच्छ भारत अभियानामध्ये स्वच्छ करण्यात आलेल्या शौचालयाची अवस्था आता दयनीय होऊ लागली आहे. पालिकेने कंपोस्ट पीट केला आहे. त्यालादेखील केराची टोपली मिळाली आहे. लोकसहभाग फक्त नावापुरताच असून नागरिक ओला व सुका कचरा वेगळा करण्यातही सहकार्य करत नसल्याचे निदर्शनास येत आहे.

स्वच्छ भारत अभियानामध्ये पालिकेने शहरात स्वच्छता अभियानाविषयी जनजागृती करण्यासाठी भिंती रंगवण्यात आल्या आहेत. तसेच शहरात सर्वच ठिकाणी फ्लेमिंगोंचे पुतळे उभारण्यात आले आहे. त्याचेदेखील आता रंग फिके पडण्यास सुरुवात झालेली आहे. भिंती रंगवलेल्या ठिकाणीदेखील पानाच्या पिचकाऱ्या मारल्याचेदेखील दिसून येत आहे. शहरात कचरा वेळेवर उचलला जात होता; पण आता वेळेवर कचरा न उचलल्यामुळे कचराकुंडीच्या ठिकाणी कचरा दिसून येत आहे. हॉटेलचालकही रात्रीच्या वेळी हॉटेल बंद केल्यानंतर बिनधास्तपणे कचराकुंडीच्या बाहेर कचरा टाकत आहेत.

प्रशाधनगृहांची देखभाल नाही
गृहनिर्माण सोसायटीमधील नागरिक ओला व सुका कचरा वेगळा करत नाहीत. एकाच डब्यामध्ये ओला व सुका दोन्ही प्रकारचा कचरा टाकला जात आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नवीन प्रसाधनगृहे उभारण्यात आली आहेत; परंतु देखभाल करण्याची यंत्रणाच निर्माण करण्यात आली नाही.

हागणदारीमुक्तीचा दावा फोल
सकाळच्या वेळी पालिकेचे कर्मचारी हागणदारीमुक्त करण्यासाठी फिरायचे; तर हागणदारीमुक्त करण्यासाठी पालिका लक्ष देत होती; मात्र स्वच्छ भारत अभियानानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी याकडे पाठ फिरवल्यांनतर हागणदारीमुक्तीचा दावा फोल ठरला आहे. डोंगरभागातील यादवनगर, विष्णूनगर या भागात उघड्यावर बिनधास्तपणे शौचास बसत असल्याचे दिसून येत आहे.

पालिकेची मेहनत व्यर्थ
नवी मुंबई पालिका स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत; पण काही समाजकंटकांमुळे नवी मुंबई शहराला गालबोट लागत आहे. जिथे स्वच्छतेचा संदेश देणारे फलक लावले आहेत, त्याच ठिकाणी कचरा टाकला जात आहे. नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे या स्वच्छ भारतमध्ये सहभागी होण्याची आवश्यकता असून यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मत काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

स्वच्छ भारत अभियान सुरू असताना अस्वच्छ रस्तेदेखील स्वच्छ केले जातात. शौचालयचीदेखील साफसफाई ठेवण्यात येते. मात्र स्वच्छ भारतचे पथक पाहणी करून गेल्यानंतर, पहिल्यासारखी परिस्थिती होत आहे.
- अतुल आवरी पाटील, नागरिक

स्वच्छ भारत अभियानमध्ये पालिका शहरांमध्ये सुशोभीकरण करत असते; तर सर्व नवी मुंबईकरांनीदेखील यामध्ये सहभागी होणे अपेक्षित आहे. जशी शहर स्वच्छ ठेवणे ही पालिकेची जवाबदारी आहे. तशीच ती नागरिक म्हणून नवी मुंबईकरांचीदेखील आहे.
- अभिजित बांगर, आयुक्त नवी मुंबई महापालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82100 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top