
पेण तालुक्यातील भातशेती मशागतीला वेग
पेण, ता. १२ (वार्ताहर) : काही दिवसांपासून वातावरणात बदल होऊन उन्हाचा पारा वाढला आहे. दोन दिवसांपासून तर ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी पेण तालुक्यातील भातशेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आला आहे. ग्रामीण भागातील शेतकरी या कामांमध्ये व्यग्र झाले आहेत.
राज्यात तीन वर्षांपासून सतत मुसळधार पाऊस, चक्रीवादळ, तोक्ते वादळ, वादळ वाऱ्यासह पाऊस, कोरोना संसर्ग या सर्व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी राजा पूर्णता होरपळून गेला आहे. या वर्षी मात्र सर्व गोष्टींना बाजूला सारून तालुक्यातील शेतकरी नव्या उमेदीने शेती कामात लागले आहेत. हवामान खात्याने राज्यात लवकरच पाऊस असल्याचे सांगितल्याने शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीचे नियोजन करत आहेत. शेतीसाठी लागणारा रासायनिक खताच्या किमती गगनाला भिडले आहे. शेती साहित्य, बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशकांसह शेतात काम करणाऱ्या मजुरांचेही दर वाढले आहे. मात्र, भाताच्या उत्पादनात हमीभाव मिळत आहे.
दिवसेंदिवस हवामान खात्यात बदलत होत असल्याने कधी ढगाळ वातावरण, तर कधी पाऊस, तर कडाक्याच्या ऊन पडत आहे. त्यामुळे बळीराजा शेतात नांगरणी, वखरणी, काटेरी झुडपे तोडून, बांध दुरुस्ती करण्यासाठी आणि इतर शेतीच्या कामात मग्न झाला आहे. त्यात भातशेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे.
यावर्षी मोठ्या प्रमाणात सर्वच वस्तूंची भाववाढ झाल्यामुळे शेतीच्या कामांना लागणाऱ्या वस्तूही महाग झाल्या आहेत. गेल्या वर्षी पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. या वर्षी मात्र चांगले पीक यावे, यासाठी पावसाळ्यापूर्वीच शेतकरी मशागतीच्या कामांना लागला आहे.
- जयेश पाटील, शेतकरी
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82106 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..