
पालकांकडून सक्तीची शुल्क वसुली चालुच
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : कोरोना काळात आर्थिक स्थिती डबघाईला आल्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे; तरीही ठाण्यातील अनेक शाळांनी यंदाही शुल्कवाढ करत एकरकमी शुल्क भरण्याचा आग्रह पालकांकडे धरला आहे. याबाबत ठाणे पालिकेच्या शिक्षण विभागाने परिपत्रक काढत सर्वच खासगी शाळांना पालकांकडून शुल्क टप्प्याटप्प्याने घेण्याचे निर्देश दिले आहेत; तरीही अनेक शाळांनी पालकांकडून एकरकमी शुल्क वसूल केले आहे. शाळांनी पालकांची लूट न थांबवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे.
मागील दोन वर्षे लॉकडाऊनमध्ये शाळा बंद होत्या. या काळात ऑनलाईन वर्ग सुरू होते; मात्र तरीही अनेक खासगी शाळांनी पालकांकडे शुल्कासाठी तगादा लावला होता. अनेक शाळांनी पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शुल्कवाढसुद्धा चालू शैक्षणिक वर्षात केली. कोरोना काळात घर चालवण्यासाठी तारेवरची कसरत सुरू असताना वाढीव शुल्क भरणे पालकांना शक्य नाही. याप्रश्नी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी पालकांच्या वतीने शिक्षण विभागाला निवेदन दिले होते. त्यानुसार शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकात शाळांनी टप्प्याटप्प्याने शुल्क घेण्याचे आदेश दिले आहेत; मात्र तरीही अनेक शाळा या निर्णयाला हरताळ फासत जाचक पद्धतीने शुल्कवसुली करत असल्याचा आरोप मनविसे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केला आहे.
…...............................
परिपत्रक पालकांपर्यंत पोहचण्यास विलंब
यंदाच्या मार्च महिन्यात ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने परिपत्रक जारी केले आहे; मात्र हे परिपत्रक सर्वसामान्य पालकांपर्यंत पोहचलेच नाही. अनेक शाळांनी हे परिपत्रक दडवून त्यांचे आर्थिक गणित सोडवण्यात धन्यता मानल्याचा आरोप मनविसे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केला.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82130 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..