
चमडावाडी नाल्याचा कचराकुंडीसारखा वापर
मुंबई, ता. १२ ः मुंबईत बीकेसीसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी देणाऱ्या वांद्रे स्टेशनबाहेरील नाल्यात नागरिकांकडून फेकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि कंत्राटदार जेरीस आले आहेत.
नालेसफाईसाठी मुंबई महापालिकेची यंत्रणा गेल्या काही दिवसांपासून अहोरात्र काम करत आहे; पण अनेक ठिकाणी नालेसफाईच्या कामाला वेग आल्यानंतरही नागरिकांच्या बेजबाबदार वागणुकीमुळेच नाल्यात पुन्हा फ्लोटिंग कचरा आढळून येत आहे. वांद्रे स्टेशनच्या समोरच असलेल्या चमडावाडी नाल्यातच नागरिक घरातून कचरा फेकत असल्याने नालेसफाई करूनही मुंबई महापालिकेच्या मेहनतीवर पाणी फेरले जात असल्याचे चित्र आहे. आपल्या घरातील कचरा हा कचरा कुंडीत टाकण्याऐवजी थेट नाल्यातच फेकला जात आहे.
घरातूनच थेट नाल्यात कचरा टाकण्याच्या नागरिकांच्या सवयीमुळे या ठिकाणी पुन्हा एकदा नाल्यात कचरा दिसून येत आहे. मुंबई महापालिकेने गेल्या दोन वर्षांत या नाल्याचे खोलीकरण केले आहे. सात मीटरचा नाला १४ मीटर करण्यात आला आहे. तसेच नाल्याच्या दोन्ही बाजूंना काँक्रीटच्या भिंतीही उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळेच गेल्या दोन वर्षांत नाला भरून पाणी शेजारच्या लोकवस्तीत जाण्याचा प्रकार घडलेला नाही. तसेच या ठिकाणी पाणीही गेल्या दोन वर्षांतील कामामुळे भरले नसल्याचे पालिकेचे अधिकारी सांगतात; पण नागरिकांकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यानेच नालेसफाईनंतरही कचरा आढळून येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नाल्याच्या रुंदीकरणाचे आणि खोलीकरणाचे काम हे येत्या २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.
...
दुबार काम करावे लागते!
नालेसफाईचे काम केल्यावरही फ्लोटिंग कचरा काढण्याचे दुबार काम कंत्राटदारांना करावे लागत आहे. या कचऱ्यामध्ये मुख्यत्वे प्लास्टिक आढळून येत असल्याचेही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. एकूण १.६ किलोमीटरच्या नाल्यात अनेक ठिकाणी प्लास्टिक आणि घरातील कचरा थेट फेकण्यात येतो. त्यामुळेच अनेक ठिकाणी फ्लोटिंग कचरा दिसतो.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82131 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..