चुकीच्या प्रकारे सभासद झाल्यास... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चुकीच्या प्रकारे सभासद झाल्यास...
चुकीच्या प्रकारे सभासद झाल्यास...

चुकीच्या प्रकारे सभासद झाल्यास...

sakal_logo
By

प्रश्न ः संस्थेत सभासद म्हणून येणारी व्यक्ती चुकीच्या, बेकायदेशीर पद्धतीने सभासद म्हणून नोंदवली गेली असेल तर तिला सभासद म्हणून काढून टाकण्यासाठी काही व्यवस्था-तरतूद आहे का? या सभासदाचे सभासदस्यत्व रद्द करण्याची (एक्सपेल) कारवाई करण्याचा सल्ला संस्थेला दिला गेला आहे, याबाबत काय करावे?
- विजय गावडे, गिरगाव
उत्तर ः जी व्यक्ती कथित अयोग्य प्रकारे सभासद झाली आहे तिला व संस्थेलादेखील यासंदर्भात कायद्यात नुकत्याच झालेल्या बदलानुसार कायदा कलम १५४ (बी) ९ नुसार संधी मिळते. या कलमांतर्गत कोणीही म्हणजे संस्था किंवा दुसरा सभासददेखील निबंधकांकडे अर्ज करू शकतो. त्यानुसार दोन्ही पक्षकार, तसेच ज्या व्यक्तीस सभासदत्व मिळाले आहे त्यांचे म्हणणे निबंधक ऐकतात व बाजू मांडण्याची योग्य संधी उपलब्ध करून देतात. सुनावणी आणि कागदपत्रे यांच्या आधारे निर्णय घेतला जातो. त्यामुळे चुकीच्या किंवा बेकायदेशीररीत्या कोणी सभासद संस्थेमध्ये आल्यास वा अयोग्य व्यक्तीचे सभासदत्व चुकीच्या पद्धतीने झाले असल्यास त्या व्यक्तीचे सदस्यत्व संस्थेच्या पटलावरून काढून टाकण्यात येते. ही तरतूद अत्यंत योग्य, कमी खर्चिक व तत्काळ करण्यासारखी आहे. आपणास त्या सदस्याला एक्सपेल करण्याचा सल्ला मिळाला आहे, त्यानुसार कार्यवाही करू नये. कारण सभासदस्यत्व रद्द करण्याचे निकष, कारणे व करण्याची पद्धत वेगळी आहे व ती आपल्या समस्येवरील कायदेशीर उत्तर नाही. तसेच या प्रक्रियेमध्ये अनेक स्तरांवर कार्यवाही करायला लागते, ती वेळकाढू, खर्चिक तसेच तुमच्या समस्येकरिता योग्य नाही. याविषयी आपण सहकार कायद्याचा अभ्यास असलेल्या वकिलाकडून मार्गदर्शन घ्यावे व निबंधक कार्यालयात अर्ज करावा.

प्रश्न ः आमच्या संस्थेत एक सदस्य त्याच्या कुटुंबातील व्यक्तीसोबत सदनिकेचा सहमालक आहे. संस्थेने केवळ पहिल्या सहमालकाचे नाव संस्थेच्या दप्तरामध्ये तसेच भागधारक दाखल्यावर घेतले आहे. आता दुसरा सहमालक संस्थेच्या मागे लागला आहे की त्याचे नाव आणि संस्थेच्या दप्तरामध्ये, तसेच भागधारक दाखल्यावर घ्यावे. पहिला नाव असलेला सभासद त्याला तीव्र आक्षेप घेत आहे, याबाबत काय करावे?
- संतोष राणे, घाटकोपर
उत्तर ः आपण दिलेल्या माहितीच्या आधारे असे कळते, ही सदनिका कुटुंबातील दोन व्यक्तींनी एकत्र येऊन घेतली आहे. करारनाम्यामध्ये दोन्ही व्यक्तींची नावे खरेदीदार म्हणून आहेत. स्वाभाविकपणे दोन व्यक्तींपैकी एकाचे नाव प्रथम व दुसऱ्याचे नाव त्यानंतर लागेल. करारनाम्यामध्ये दोन्ही व्यक्तींचे मालमत्तेमधील भाग-हिस्सा किती आहे याविषयी काही स्पष्टीकरण आहे का, ते संस्थेने पाहावे. म्हणजे त्या सदनिकेमधील दोन्ही सहमालकांची हिस्सेदारी समोर येईल; परंतु त्या हिस्सेदाराचा संस्थेमधील सहभागाविषयी काही विशेष संबंध नाही. केवळ ही माहिती संस्थेमध्ये असणे आवश्यक आहे. हिस्सा-हक्क याचा उल्लेख करारामध्ये नसल्यास असे हक्क समान आहेत, असे समजावे. संस्थेच्या दप्तरी अशा सहमालकीची नोंद त्यांच्या करारामधील क्रमानुसार करणे आवश्यक आहे. म्हणजे करारामध्ये ज्याचे नाव प्रथम आहे त्याचे नाव संस्थेच्या दप्तरी व भाग दाखल्यांमध्ये प्रथम क्रमांकाने येणे आवश्यक आहे. महाराष्ट्र सहकार अधिनियम १९६० मध्ये २०१९ मध्ये झालेल्या बदलानुसार सहमालकांना सहसभासद म्हणजे जॉईंट मेंबरचा दर्जा आहे. त्याचा दर्जा असोसिएट मेंबरपेक्षा वेगळा व महत्त्वाचा आहे. या बदलानुसार सहमालक आता सहसभासद आहेत, त्यांचे नाव संस्थेच्या सर्व दप्तरांत तसेच भाग दाखल्यावर घेता येणार आहे. तसेच त्यांचे अधिकार, हक्क, कर्तव्य इत्यादी हे प्रथम सभासदाच्या शिवाय कायद्यातील तरतुदींचे पालन करून त्या सहसभासदास वापरता येणार आहेत. हे कायद्यातील बदल महाराष्ट्रामधील सर्व गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या उपविधीमध्ये कोणत्याही तरतुदी असल्यास किंवा नसल्यास अमलात आणणे बंधनकारक आहे. त्यामुळे या समस्येबाबत सहमालकाचे नाव संस्थेच्या दप्तरामध्ये भाग दाखल्यावर घ्यावे. प्रथम सभासद म्हणजे सहमालक ज्याचे नाव प्रथम आहे त्याच्या आक्षेपांना कायद्यामधील कोणतेही आधार नाहीत, संस्थेने कायद्याप्रमाणे वागणे आवश्यक आहे.
- शरदचंद्र देसाई, वकील, सहकार न्यायालय.

सहकारी संस्था, सहकार कायदा याबाबतचे आपले प्रश्न पुढील ई-
मेल वर पाठवावेत - Sharadchandra.desai@yahoo.in

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82151 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top