
‘धर्मवीर’ला शिवसैनिकांसह नागरिकांचा प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १३ ः शिवसेनेचे नेते दिवंगत आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘धर्मवीर मु. पो. ठाणे’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. या चित्रपटाला कल्याण-डोंबिवलीत शिवसैनिकांसह नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चित्रपटाच्या पहिल्या शो ला सुरुवात करण्यात आली. यासाठी ठाण्यातील विवियाना मॉल या ठिकाणी लेझीम, तसेच ताशाच्या गजरात शालेय विद्यार्थीदेखील सहभागी झाले होते. या वेळी सेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या पोस्टरला एकनाथ शिंदे, अभिनेते प्रसाद ओक, निर्माते मंगेश देसाई, खासदार श्रीकांत शिंदे, राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, विलास जोशी यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला.
दिघे यांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या या चित्रपटाचे शिवसैनिकांनी शहरोशहरी जंगी स्वागत केले. नागरिकांना हा चित्रपट पाहता यावा यासाठी डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, युवा जिल्हाधिकारी दिपेश म्हात्रे यांनी मोफत सुविधा देऊ केली होती; तर कल्याणमध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी दिघे यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालत आदरांजली वाहिली. मल्लेश शेट्टी यांच्यावतीने मेट्रो मॉलमधील पहिला शो नागरिकांसाठी मोफत ठेवण्यात आला होता. ढोल-ताशांच्या गजरात यावेळी शिवसैनिकांनी व नागरिकांनी थिएटरमध्ये प्रवेश केला. तसेच रवि पाटील यांनीदेखील सर्वोदय मॉल येथे सायंकाळचा शो नागरिकांसाठी मोफत ठेवला होता. कल्याण डोंबिवलीकरांनीदेखील पहिल्याच दिवशी थिएटरमध्ये हा चित्रपट पाहाण्यासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. चित्रपट सुरू होताच आनंद दिघे अमर रहेच्या घोषणांनी थिएटर परिसर दुमदुमून गेला होता.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82162 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..