
अचूक बिलींगसाठी कल्याण परिमंडळात मोहीम
कल्याण, ता. १३ (बातमीदार) ः कल्याण परिमंडळात ग्राहकांचे अचूक बिलिंग करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी मीटर रीडिंगमध्ये येणारे अडथळे दूर करण्यात येणार आहेत. या मोहिमेत ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी केले आहे.
मीटर रीडिंग प्रक्रियेत एजन्सीकडून घेण्यात येणारे रीडिंगचे छायाचित्र महत्त्वाचे असते; परंतु मीटर उंचावर असणे, डिस्प्ले अस्पष्ट असणे, मीटर घरात असणे, मीटर पक्क्या बॉक्समध्ये असणे अशा विविध कारणांनी मीटर रीडिंगचे छायाचित्र अस्पष्ट येते. परिणामी अचूक वीजबिल देण्यात अडथळे निर्माण होत आहेत. त्यासाठी उंचावरील मीटर खाली बसवणे, घरातील मीटर बाहेर काढणे, डिस्प्ले स्वच्छ करून घेणे, पक्के बॉक्स काढून टाकणे आदी कामे करण्यात येणार आहेत. जेणेकरून मीटर रीडिंगचे स्पष्ट छायाचित्र घेणे एजन्सीला सोयीचे होईल. परिणामी शंभर टक्के अचूक बिलिंगलाही मोठी मदत होऊ शकेल.
महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी शंभर टक्के अचूक बिलिंगचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यापासून एजन्सीने घेतलेले मीटर रीडिंगचे छायाचित्र तपासण्यात येत आहेत. या तपासणीत छायाचित्र नाकारले जाण्यामागील कारणांचा शोध घेऊन सुधारणांची मोहीम राबवण्यात येत आहे. कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनीही नुकतीच पालघर येथे वसई व पालघर मंडळाची बैठक घेऊन अचूक रीडिंगबाबत सूचना दिल्या आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82164 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..