
नवी मुंबईत लसीकरण अंतिम टप्प्यात
वाशी, ता. १३ (बातमीदार) ः नवी मुंबईत कोरोना प्रतिबंधक लसीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. शहरात सर्व वयोगटातील मिळून १२ लाख २७ हजार ८३२ लाभार्थी आहेत. यापैकी ११२ टक्के पहिल्या तर ९९ टक्के दुसऱ्या लसमात्रांचे लसीकरण झाले आहे.
शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार होत आहे. मात्र बहुतांश नागरिकांचे लसीकरण झाले असल्याने घाबरून न जाता योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन कोरोना टास्क फोर्सच्या पथकाने केले आहे. १६ जानेवारी २०२१ पासून देशभरात लसीकरण मोहीम सुरू झाली होती. त्यानंतर नवी मुंबई महापालिकेने राज्यात सर्वात प्रथम १४ महिन्यांतच १८ वर्षांवरील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण केले होते. यात नवी मुंबई हे राज्यातील पहिले शहर ठरले होते. ११ लाख ७ हजार नागरिक दोन्ही लसमात्रा घेऊन लसवंत झाले आहेत. तसेच १२ ते १४ आाणि १५ ते १८ वयोगटातील लसीकरणातही नवी मुंबईने आघाडी घेतली आहे.
शहरात १५ ते १८ वर्षांवरील किशोरवयीन मुलांचे पहिल्या लसमात्रेचे १०० टक्के, तर दुसरी मात्रा घेणाऱ्यांचे ८६.७२ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे; तर १२ ते १४ वयोगटात पहिली मात्रा ८१ टक्के तर दुसरी मात्रा ५४.७४ टक्के जणांनी घेतली आहे. एकूण लसीकरणात शहरातील ११२ टक्के पहिल्या तर ९९ टक्के दुसऱ्या लसमात्रेचे लसीकरण झाले आहे.
----
महापालिकेने जास्तीत जास्त लसीकरण केंद्रे उभारून हर घर दस्तक, कवचकुंडल यांसारखे विविध उपक्रम राबवल्यामुळे लसीकरणात शहर आघाडीवर आहे. शहरात पालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सुयोग्य नियोजन केल्यामुळे शहरात इतर महापालिकांच्या तुलनेत चांगले लसीकरण करण्यात आले आहे. अद्यापही ज्या नागरिकांची दुसरी लसमात्रा घेणे बाकी आहे त्यांनी नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊन महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन लसीकरण प्रमुख डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82167 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..