
औरंगजेबाच्या कबरीवर जाणाऱ्या ओवेसींचा निषेध
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता.१३ ः औरंगजेब हा स्वराज्याचा शत्रू होता. त्याने हिंदूंच्या देवस्थानांची नासधूस केली. ज्यांनी स्वराज्याशी द्रोह केला अशा औरंगजेबाच्या कबरीला ओवेसी
भेट देतात. ओवेसींनी जे केले त्याचा मी निषेध करतो, अशी संतप्त प्रतिक्रिया नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीत व्यक्त केली. ठाणे जिल्हा आगरी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित प्रगती कला व वाणिज्य महाविद्यालय डोंबिवली यांच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ठाणे जिल्ह्यातील कीर्तनकार सन्मान सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी (ता. १३) करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले नाट्यगृह येथे आयोजित या सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील, गणपत गायकवाड, रवींद्र चव्हाण, उद्धव मंडलिक, जगन्नाथ पाटील, दत्तात्रय वझे, संतोष केणे, अशोक महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबाद दौऱ्यावर असताना खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. यावर पालकमंत्री शिंदे यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, खासदार शिंदे यांनी कल्याण-शीळ रस्त्याला संत सावळाराम महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली. यावर पालकमंत्री शिंदे यांनी पूर्ण प्रक्रियेनुसार ही मागणी तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाविषयी बोलताना ते म्हणाले की, ठाणे जिल्ह्यात उत्तम कीर्तनकार आहेत. कीर्तनकार समाज प्रबोधन करीत समजाला दिशा देण्याचे काम करीत आहेत. अन्यायाविरोधात कीर्तनाच्या माध्यमातून वार करण्याचे काम वारकरी करत असतात. ठाण्यात वारकरी भवन उभारण्यात आले आहे. खासदार श्रीकांत यांच्या मागणीनुसार दिवा बेतवडा येथे आगरी-कोळी वारकरी भवनसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. कल्याण-डोंबिवलीतील वारकऱ्यांची संत सावळाराम वारकरी भवन उभारण्याची मागणी आहे. त्यासाठी जागा उपलब्ध करून घ्या, निधी मी देईन, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
--------------
मार्गावरून श्रेयवाद
कार्यक्रमात कल्याण-शीळ रोडला संत सावळाराम महाराज यांचे नाव देण्याची घोषणा पालकमंत्री शिंदे यांनी केली. यावर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी अप्रत्यक्षपणे सेनेला टोला लगावला. कोणी कितीही काही म्हटले तरी वारकऱ्यांसाठी महामार्ग हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नितीन गडकरी यांनी बांधला आहे, असे ते म्हणाले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82188 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..