येऊरमध्ये पर्यटकांसाठी सुविधा केंद्र उभारणार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

येऊरमध्ये पर्यटकांसाठी सुविधा केंद्र उभारणार!
येऊरमध्ये पर्यटकांसाठी सुविधा केंद्र उभारणार!

येऊरमध्ये पर्यटकांसाठी सुविधा केंद्र उभारणार!

sakal_logo
By

ठाणे, ता. १४ ः येऊर गाव येथील वनजमिनीवरील अतिक्रमणे कारवाई करून पूर्णतः हटवण्यात वन विभागाला यश आले आहे. तसेच येऊर येथील मोकळ्या भूखंडाचा गैरवापर भविष्यात होऊ नये याकरिता येथे एक मीटर खोलीचा चर खोदण्यात आला आहे. येऊर येथे भेट देणाऱ्या पर्यटकांना येथील समृद्ध जैवविविधता, तसेच येथील आदिवासी संस्कृतीची माहिती देण्यासाठी सुविधा केंद्र उभारण्याबाबत वन विभाग प्रयत्नशील असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.
संजय गांधी राष्ट्रीय उद्याना अंतर्गत येऊर गाव येथील वनक्षेत्रातील मोकळ्या भूखंडाचा काही समाजकंटकांतर्फे वापर सुरू होता. मंडप सजावटीसाठी तसेच बांधकाम व्यवसायासाठी लागणारे साहित्य फार मोठ्या प्रमाणावर येथील मोकळ्या भूखंडावर जमा करून या जागेचा गोडाऊनसारखा वापर सुरू होता. हे साहित्य वाहून नेण्यासाठी लागणारी रिक्षा, जीप अशी हलकी वाहने, तर टेम्पो, ट्रक यांसारखी अवजड वाहने येथे बेकायदेशीर कायमस्वरूपी उभी करून या जागेचा वाहनतळासारखा वापर सुरू होता. येथे मोठ्या प्रमाणात बेशिस्त पर्यटकांकडून कचराही टाकला होता. या सर्वाचा संरक्षित वन्यजीवांच्या अधिवासावर गंभीर परिणाम होत असल्याने अतिक्रमणांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीच्या सर्व संलग्न संस्थांच्या वतीने येऊर परिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती.
त्याला सकारात्मक प्रतिसाद देत वन विभागाने २४ तासांच्या आत केलेल्या धडक कारवाईत येऊर गाव येथील वनजमिनीवरील अतिक्रमणे पूर्णतः हटवण्यात आली आहेत. येथील मोकळ्या भूखंडांचा गैरवापर भविष्यात होऊ नये याकरिता येथे १ मीटर खोलीचा चर खोदण्यात आला आहे.

वन विभागाद्वारे स्वच्छता मोहीम
वन विभागाद्वारे हा परिसर अतिक्रमण मुक्त झाल्यावर पुढचे आव्हान होते ते येथे साचलेल्या कचऱ्याचे. येथे थर्माकोल प्लेट्स, सर्व प्रकारचे प्लास्टिक, दारूच्या बाटल्या यांचा खच जमा झाला होता. वन खाते व येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीच्या कार्यकर्त्यांद्वारे श्रमदान करून जंगलात जागोजागी पसरलेला कचरा साफ करण्यात आला.

विविध घटकांकडून निर्माण होणारा कचरा लगतच्या जंगल क्षेत्रात फेकला जातो. यामुळे जंगले नासत आहेत, तसेच वन्यप्राणी फेकलेल्या पिशव्यांतील खाद्यपदार्थ खाण्याच्या लालसेने गंभीर आजारांना बळी पडत आहेत. त्यामुळे कचरा करणाऱ्यांविरोधात ठाणे पालिकेने कारवाई करणे गरजेचे आहे.
- रोहित जोशी, येऊर, एन्व्हायर्नमेंटल सोसायटी.

लवकरच अतिक्रमणमुक्त वन जमिनीवर येऊर येथे भेट देणाऱ्या पर्यटकांना येथील समृद्ध जैवविविधता, तसेच येथील आदिवासी संस्कृतीची माहिती देण्यासाठी सुविधा केंद्र उभारण्याबाबत वन विभाग प्रयत्नशील राहील.
- गणेश सोनटक्के , अधिकारी, येऊर वन परिक्षेत्र.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82198 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top