
मान्सूनपूर्व कामांना वेग
वाशी, ता. १४ (बातमीदार) : पावसाळापूर्व नाले, बंदिस्त गटारे सफाई कामे अंतिम टप्प्यात आहेत. ती तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले. शुक्रवारी (ता. १३) दिघा व ऐरोली विभागातील नाले, गटारे व मलनिस्सारण वाहिन्यांच्या सफाई कामाची व पावसाळापूर्व कामांची आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
संबंधित विभागाचे सहायक आयुक्त तथा विभाग अधिकारी, तसेच कार्यकारी अभियंता यांनी प्रत्येक ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी करावी, अशा आयुक्तांनी सूचना केल्या. मुकंद कंपनीजवळील जंक्शनच्या ठिकाणी या वर्षी कल्व्हर्ट बांधण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्या ठिकाणी यंदा पाणी भरणार नाही, अशी माहिती अभियांत्रिकी विभागामार्फत देण्यात आली. तरीही याठिकाणी व मागील वर्षी सखल भागामुळे पाणी साचले, अशा ठिकाणी पुरेशा प्रमाणात पाणी उपसा पंपांची व्यवस्था करून ठेवावी, असे निर्देश दिले. बंदिस्त गटारांची सफाई केल्यानंतर गाळ ओला असल्याने काठाशी सुकण्यासाठी ठेवला जातो. तो दोन दिवसांनंतर उचलण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. रबाले टी जंक्शन येथील नालेसफाईच्या कामांची पाहणी करताना आयुक्तांनी तेथे सफाई काम करणाऱ्या कामगारांशी संवाद साधला.
नाल्यांतील पाण्याची तपासणी होणार
नैसर्गिक नाल्यांत काही ठिकाणी उद्योगांकडून रासायनिक द्रव्ये सोडली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यादृष्टीने नवी मुंबई महापालिकेच्या वतीने नाल्यातील पाण्याची गुणवत्ता तपासणी करण्यात यावी व त्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाला कळवून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, असेही निर्देश आयुक्तांनी दिले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82202 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..