रहाटाचा मधुर स्वर गायब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रहाटाचा मधुर स्वर गायब
रहाटाचा मधुर स्वर गायब

रहाटाचा मधुर स्वर गायब

sakal_logo
By

अभय आपटे, रेवदंडा
एकत्र कुटुंब पद्धतीची झालेली समाप्ती, सर्वच व्यवसायात आलेली आधुनिकता, रहाट दुरुस्तीला कारागीरांची भासत असलेली उणीव या सर्व गोष्टींमुळे चौल-रेवदंड्यात कानाला मधुर वाटणारा रहाटाचा स्वर आता गायब झाला आहे. रुंद तोंडाच्या विहिरीतून दोरीला बादली बांधून पुलीच्या मदतीने पाणी वर काढले जाते त्या चाकाला रहाट म्हटले जाते. अनेक ठिकाणी आता विहिरींवर फक्त रहाटाचे अवशेष पाहायला मिळत आहेत.
पूर्वी बागायतीला पाणीपुरवठा करण्यासाठी वाडीतील मोठ्या विहिरीला लाकडी किंवा लोखंडी रहाट बसवले जायचे. या रहाटाला लोखंडी डबा किंवा मातीच्या मडक्यातून ज्याला बांडी म्हटले जाते त्याद्वारे पाणी उपसले जायचे. हे पाणी दांडाद्वारे किंवा पाटाद्वारे केळी, नारळ, पानवेल इत्यादी झाडांना पुरवले जायचे. साधारणपणे २०-२२ मडक्यांची माळ गोलाकार चक्रावर लावून हा रहाट फिरवण्यासाठी टोणगा किंवा बैल जुंपला जातो. जो उसाच्या घाणीप्रमाणे गोलाकार फिरत असे. प्रत्येक मडक्याला बुडाला एक लहानसे छिद्र पाडले जाते जेणेकरून चक्राच्या एका बाजूला अतिभार पडत नाही. रहाटावरून पाणी काढण्याच्या प्रक्रियेमुळे नकळत का होईना व्यायाम होत असतो.
१९६० च्या आसपास अलिबाग तालुक्यातील अष्टागारात वीजपुरवठा सुरू झाला. वाड्या-वस्त्यावर लखलखाट झाला. त्याचवेळी बागायती शिंपण्यासाठी रहाटाच्या ठिकाणी वीजमीटर पंप बसवण्यात आले. सरकारने कृषी वीज पंपाप्रमाणे देयकात सूट दिल्याने बागायतीत आपोआपच आधुनिकता आली. घरोघरी आठ महिने रामप्रहरी येणारा कुं-कुं असा मधुर स्वर थांबला. सद्यस्थितीत विहिरीतून छोट्या मातीच्या लोटातून चकाकत पडणारे मोत्यासारखे पाणी पाहण्यासाठी पर्यटक व चाकरमानी बागायती शोधत आहेत. मात्र, आधुनिक पंपामुळे ही वस्तुस्थिती बदलली आहे. भडकलेली महागाई, जनावरांचे पालन-पोषण करण्यासाठी नसलेले मनुष्यबळ आणि बागायती नष्ट होऊन टोलेजंग इमारती, बंगले उभ्या राहत असल्याने रहाटगाडा इतिहास जमा झाला आहे.

वारसा म्हणून जतन
अलिबाग तालुक्यातील चौल-तुलाडदेवी येथील बागायतदार सतीश पराड (५७) यांनी गेले दोन वर्षे रहाट बंद केला आहे. मात्र, हा रहाट विहिरीवर वारसा म्हणून जतन करून ठेवला आहे. तो रहाट त्यांच्या तीन पिढ्यांचा आहे. बैलाच्या भडकत चाललेल्या किमती यामुळे रहाट बंद केल्याचे सांगितले. पर्यटक रहाट कसा असतो हे पाहायला येतात म्हणून विहिरीवर तो ठेवला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82206 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top