
खारघरमध्ये प्रोटोन थेरपीद्वारे उपचार
खारघर, ता. १४ (बातमीदार) : कर्करोगावर प्रभावी ठरणारी ‘प्रोटोन थेरपी’ उपचार पद्धती आता खारघरच्या टाटा रुग्णालयात येत्या सप्टेंबर महिन्यात सुरू होणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या रुग्णांना अत्यल्प अथवा मोफत हे उपचार घेता येणार आहेत. खारघर टाटा रुग्णालय परिसरात ६,५०० चौरस फूट जागेवर उभारण्यात येणारी अद्ययावत वास्तू कर्करोग रुग्णांसाठी जीवनदायी ठरणार आहे.
कर्करोग झालेल्या रुग्णांसमोर किमो, सर्जरी आणि रेडिएशन थेरपी हे पर्याय असतात, पण रेडिएशन प्रकारात मोडणारी ‘प्रोटोन थेरपी’ सर्वात अत्याधुनिक मानली जाते. विदेशात या थेरपीची किंमत सत्तर लाखांच्या घरात असून भारतात यासाठी साधारण चाळीस लाखांचा खर्च येतो, तर आर्थिकदृष्ट्या कमजोर गटासाठी ही सुविधा मोफत मिळू शकणार आहे.
भारत सरकारच्या ॲटॉनॉमिक सेंटरतर्फे ही प्रोटोन थेरेपी सुरू असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना अत्यल्प दरात उपचार उपलब्ध होणार आहेत. इतर उपचार पद्धतीमध्ये रुग्णांच्या ट्यूमरसोबत इतर निरोगी पेशींनाही हानी पोहोचते. तसेच शरीरावर डाग राहतात, पण प्रोटोन बीममध्ये केवळ ट्यूमरला लक्ष्य केले जाते. इतर ऑपरेशनला वेळ जास्त लागतो. शिवाय रुग्णाला त्रास जाणवतो, पण प्रोटोन थेरपीमध्ये तुलनेत वेळ कमी लागतो. केस गळती होत नाही.
खारघरमधील रुग्णालयात जवळपास सातशे कोटींचा हा संपूर्ण प्रकल्प आहे. प्रोटोन थेरपीदरम्यान रुग्णाला शरीरात कमजोरी जाणवत नाही. देशातील सर्वसामान्यांनादेखील या पद्धतीचा लाभ घेता येणार असून केंद्रात दररोज साधारण ५० रुग्णांवर थेरपीद्वारे उपचार होऊ शकतात.
चौकट
प्रोटोन थेरपी ही उपचारपद्धती खर्चिक मानली जाते. अमेरिकेसारख्या देशामध्ये या उपचाराचे एक चक्र घेण्यासाठी १० ते १२ लाख रुपयांचा खर्च करण्यात येतो. त्याचवेळी टाटा कॅन्सर रुग्णालयामध्ये कमी शुल्कात हे उपचार केले जातात. थेरपीचा फायदा कर्करोगग्रस्त मुलांना मिळणार आहे. प्रोटोन बीम थेरपीच्या मदतीने डोके, यकृत, मेंदू, स्तन, वृषण यांसारख्या कर्करोगावर उपचार करणे शक्य होणार आहे. प्रोटोन थेरपीमध्ये केवळ कर्करोगाच्या पेशी शोधून त्यांना नष्ट करण्यात येणार आहे. देशातील केवळ १२० ठिकाणी प्रोटोन बीम थेरपी उपलब्ध आहे. आता त्यात टाटा रुग्णालयाचा समावेश आहे. या मशिनची किंमत सुमारे साडे पाचशे कोटी रुपये आहे.
प्रोटोन थेरपीद्वारे होणारे उपचार, तसेच त्यासाठी लागणाऱ्या सर्व बाबींचा अभ्यास सुरू आहे. सर्व बाबींची पूर्तता करून सप्टेंबरमध्ये खारघरमधील कर्करोग रुग्णालयात सुरू करण्याचा संकल्प आहे.
- डॉ. सिद्धार्थ लश्कर, ऑन्कोलॉजिस्ट, टाटा कर्करोग रुग्णालय.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82213 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..