एक धाड... मुंब्रा पोलिसांवरच उलटला डाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एक धाड... मुंब्रा पोलिसांवरच उलटला डाव
एक धाड... मुंब्रा पोलिसांवरच उलटला डाव

एक धाड... मुंब्रा पोलिसांवरच उलटला डाव

sakal_logo
By

हेमलता वाडकर, ठाणे

एका खेळणी व्यापाऱ्याच्या घरी धाड पडते... ३० कोटींचे घबाड सापडते... पोलिस ठाण्यात पैसे मोजले जातात... एकीकडे गयावया तर दुसरीकडे ‘तोडपाणी’ची भाषा... दोन कोटींत सेटलमेंट होते... पण प्रत्यक्षात सहा कोटी हडपून उर्वरित २४ कोटी परत दिले जातात... घटनेच्या एक महिन्यानंतर गुन्हा उघडकीस येतो आणि सहा कोटी पचवण्याआधीच पोलिसांवर डाव उलटतो... एखाद्या मालिकेतील ‘क्राईम स्टोरी’लाही लाजवेल असा घटनाक्रम घडला आहे चक्क मुंब्य्रात! तोतया पोलिसांनी धाड टाकून हजारो, लाखो रुपये लुबाडल्याचे अनेक किस्से आतापर्यंत ऐकण्यात येत होते, पण ठाणे पोलिस आयुक्तालय अंतर्गत असलेल्या संवेदनशील अशा मुंब्य्रात पोलिसांनीच घातलेल्या धाडीने चक्रावून टाकणाऱ्या गुढकथा आता समोर येत आहेत.

मुस्लिमबहुल असलेला मुंब्रा कधी बेकायदा बांधकामांमुळे, तर कधी दहशतवादी कारवायांमुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र यावेळी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिसांच्या ‘कुकृत्या’मुळे मुंब्रा पुन्हा प्रकाशझोतात आले आहे. एखाद्या क्राईम स्टोरीसारखीच ही पटकथा भासावी, अशी घटना येथे घडली. तारीख होती १२ एप्रिल २०२२... वेळ मध्यरात्रीची ठिक साडेबाराची... येथील बॉम्बे कॉलनीत राहणाऱ्या खेळणी व्यापारी फैजल मेमन यांच्या घरी ‘काळा पैसा’ येणार असल्याची कुणकुण मुंब्रा पोलिसांना लागते. पोलिसांचे पथक घरी पोहोचते व एक एक करत ३० खोके उचलून पोलिस ठाण्यात आणले जातात. खोके उघडल्यावर त्यात नोटांची बंडले पाहून पोलिसही चक्रावतात. प्रत्येक खोका उघडला जातो. एक कोटीला एक खोका बोलतात, हे आतापर्यंत ऐकण्यात होते, पण येथे प्रत्यक्ष एका खोक्यात एक कोटी!
‘हा काळा पैसा आहे, अर्धी रक्कम आम्हाला दे...’ अशी दमदाटी पोलिसांकडून सुरू झाली; परंतु हा काळा पैसा नाही हे पटवून देण्यात फैजल मेमन यशस्वी होतात. पण हाती आलेली लक्ष्मी अशीच कशी जाऊ द्यायची? मग सुरू होते तडजोडीची भाषा... दोन कोटींवर ही सेटलमेंट होतेही, पण पोलिसांची लालच वाढते आणि सहा खोके आपल्याकडे ठेवून फैजल यांना ‘रफादफा’ केले जाते. फैजल यांच्या म्हणण्यानुसार तो त्यांच्या घामाचा पैसा होता, मात्र पोलिसांनी मारलेल्या डल्ल्याची फिर्याद इब्राहिम शेख नावाच्या एका तिऱ्हाईकाने (तिसऱ्याच व्यक्तीने) ठाणे पोलिस आयुक्तांसह थेट गृहमंत्र्यांपर्यंत केली. आणि एकूणच ठाणे पोलिसांची धडधड वाढवणाऱ्या या धाडसत्राचे एका महिन्याने ९ मे रोजी बिंग फुटले. पोलिस आयुक्त जयजित सिंह यांनी तातडीने दखल घेत या सर्व ‘लूटधाड’मध्ये गुंतलेल्या मुंब्रा पोलिस ठाण्याच्या १० जणांना निलंबित केले.
पोलिस निरीक्षक गीताराम शेवाळे, पोलिस उपनिरीक्षक रवि मदाने, हर्षल काळे, पोलिस कर्मचारी पंकज गायकर, जगदीश गावीत, दिलीप किरपा, प्रवीण कुंभार, अंकुश वैद्य, ललित महाजन, नीलेश साळुंखे अशी या आरोपींची नावे आहेत. एकाच वेळी एकाच पोलिस ठाण्यातील १० जण निलंबित होण्याची ठाण्यातील ही पहिलीच घटना म्हणावी लागेल. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या मुंब्रा पोलिस ठाण्यात अक्षरशा शुकशुकाट पसरला आहे. पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे याप्रकरणी तपास करत आहेत. मात्र एकूणच या सर्व प्रकारामुळे पोलिस, लुटला गेलेला व्यापारी आणि अर्जदार सगळेच संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अनेक गुढकथांना जन्म देणारी ही पटकथा ठरत असून, ‘पिक्चर तो अभी बाकी है...’ अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मेमनही संशयाच्या भोवऱ्यात
मुंब्रा पोलिसांनी ज्यांच्या घरी धाड टाकून ३० कोटी रुपये हस्तगत केले ते फैजल मेमन खेळणी व्यापारी असल्याचे प्रथम समोर आले. मात्र त्यांच्या शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार फैजल हे खेळणी व्यापारी नसून मुंबईतील मनीष मार्केटमध्ये असलेल्या हाजी नूर या प्रसिद्ध खेळणी व्यापाऱ्याकडे कामगार आहेत. फैजल अनेक वर्षांपासून बॉम्बे कॉलनीत वास्तव्याला असून, त्यांची आई मुंब्य्रातच प्लास्टिक पिशव्या विकण्याचा व्यवसाय करते. मग फैजल मेमनकडे इतके पैसे आले कुठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
धक्कादायक म्हणजे १२ एप्रिलपासून फैजल आईसह २४ कोटी रुपये घेऊन घराला टाळे ठोकून गायब झाले आहेत. ते कुठे आहेत, याची कोणतीच माहिती नसल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले; तर दुसरीकडे तपास अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अर्जामध्ये ज्या व्यापाऱ्याचे नाव फैजल असे नमूद केले आहे. मुळात त्याचे नाव सर्फराज आहे. तो खेळणी व्यापारीच असून मुंबईतून होलसेल खेळणी घेऊन ठाणे आणि परिसरातील दुकानदारांना वितरित करत असे. दरम्यान, घटनेच्या दिवसापासून गायब असलेले फैजल दोन दिवस आधीच तपास अधिकाऱ्यासमोर हजर झाले होते. दोन दिवसांत त्यात ३० कोटींच्या रकमेबाबत सर्व बिलांसह खुलासा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

निःष्पक्ष तपास होणार का?
आतापर्यंत या प्रकरणात तीन अधिकारी, सात कर्मचारी निलंबित झाले आहेत, तर दोन अधिकाऱ्यांची चौकशी सुरू होणार आहे; मात्र ही चौकशी निःष्पक्ष होणार का, असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. या सर्व प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी झोन एकचे उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्याकडे सोपवली आहे. वास्तविक अशा प्रकरणात निवृत्त न्यायाधीश किंवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशी करणे अपेक्षित असते; मात्र डल्ला मारलेल्या सहा कोटींचे वाटप मुंब्रा पोलिस ठाण्यातील शिपायापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत, तसेच ठाणे पोलिस दलातील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत झाल्याचा आरोप होत आहे.

अर्जदाराचा शोध सुरू
ज्या व्यापाराला लुटले गेले, त्याने अद्याप कोणतीही तक्रार पोलिस ठाण्यात केली नाही, तर एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी, तसेच शेख इब्राहिम पाशा नावाच्या मुंब्र्यातीलच स्थानिक रहिवाशांच्या तक्रारी अर्जावर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. हे दोघेही अर्जदार गायब असून आता पोलिस जबाब नोंदवण्यासाठी त्यांचा शोध घेत आहेत.

काही प्रश्नचिन्ह
संपूर्ण ठाणे पोलिस दलाला हादरवून टाकणाऱ्या या ‘लूटधाड’बाबतच्या तपासासह कथित व्यापारी मेमन, फिर्यादी शेख यांच्याबाबतही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
प्रश्न क्रमांक १ : या धाडीसंदर्भात आणि नंतर पोलिसच आरोपी निघाल्यावर याप्रकरणी अद्याप गुन्हा का दाखल झाला नाही?
प्रश्न क्रमांक २ : पोलिसांचे निलंबन झाले, पण त्यांच्यावर खंडणी, लुटमार असे गुन्हे का दाखल झाले नाहीत?
प्रश्न क्रमांक ३ : सहा कोटी पचवायचे तर ते एकट्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या आवाक्यात नाहीत. मग त्यात कोणते वरिष्ठ अधिकारी गुंतले आहेत?
प्रश्न क्रमांक ४ : फैजल मेमन जर साधा कामगार आहे व त्यांची आई प्लास्टिक पिशव्या विकायची, तर त्यांच्याकडे इतकी रक्कम कशी आली?
प्रश्न क्रमांक ५ : एक मालक नोकराकडे इतकी मोठी रक्कम ठेवायला का देईल. तसेच मेमन हे व्यापारी असले हे सिद्ध झाले तरी त्यांच्याकडे इतकी मोठी रक्कम कशी आली?
प्रश्न क्रमांक ६ : फैजल निर्दोष आहेत, तर मग ते समोर का येत नव्हते? त्यांनी तक्रार का दाखल केली नाही? त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे?
प्रश्न क्रमांक ७ : हवालासाठी ही रक्कम वापरणार होते का?

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82214 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top